लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : मागील तीन वर्षांपासून नापिकीचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. पूर्वीच अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे मेटाकुटीस आलेल्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची आता कपाशीवर आलेल्या मर अन् दहीया रोगाने चिंता वाढविली आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा कपाशी उत्पादकांना एक किंवा दोन वेचणीनंतर कपाशीची उलंगवाडी करावी लागेल अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.मागील वर्षी गुलाबी बोंडअळीने जिल्ह्यात चांगलाच कहर केला. त्यावेळी समाधानकारक उत्पन्न झाले नसल्याचेही शेतकरी सांगतात. यंदा पून्हा मोठा धोका पत्कारून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. शिवाय बोंडअळीला अटकाव घालण्यासाठी हंगामाच्या सुरूवातीला कामगंध सापळ्यांचा वापरही केला. परंतु, सध्या कपाशी पिकावर मर अन् दहीया या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या रोगाचा प्रादुर्भात या भागातील शेतकरी गजानन डायरे, प्रदीप भोयर, किशोर बेलसरे, प्रकाश डफरे, गणेश बेलसरे, नरेश झोड, मोरेश्वर घोडे यांच्या शेतातील उभ्या कपाशी पिकावर दिसून येत आहे. यावर्षी अल्प पाऊस झाला असला तरी पिकांची स्थिती चांगली होती. परंतु, ५ ते ६ दिवसांपासून काही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीचे झाडे वाळत असल्याचे दिसून येत आहे. या रोगामुळे कपाशीच्या झाडांची पाने लालसर, काळपट येवून झाडच वाळत असल्याचे शेतकरी सांगतात. झाडे वाळत असल्यामुळे पाती, फुलं, येणे बंद झाले आहे. शिवाय रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी जी बोंड भरली आहेत ते बोंडे फुटणे सुरू झाले आहे. यामुळे कापूस उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. इतकेच नव्हे तर एक किंवा दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी करावी लागेल असा कयास शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे. सध्या स्थितीत चांगलेच ऊन तपत आहे. तसेच जमिनीतील ओलावाही पाहिजे तसा नसल्याचे शेतकरी सांगतात. पांढरी माशी व चुरडा बरेच दिवस पऱ्हाटीवर राहिल्यामुळे पानातील रस पूर्णत: त्यांनी शोसून घेतला. शिवाय झाडे वाळत आहेत. त्यामळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.
कपाशीवर ‘मर अन् दहीया’चे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:05 AM
मागील तीन वर्षांपासून नापिकीचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. पूर्वीच अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे मेटाकुटीस आलेल्या कपाशी उत्पादक शेतकºयांची आता कपाशीवर आलेल्या मर अन् दहीया रोगाने चिंता वाढविली आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांची चिंता वाढली : एक-दोन वेचणीत कपाशीच्या उलंगवाडीची शक्यता