विनोद घोडे।लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिला. तर सध्या सूर्यनारायण आग ओकू पाहत आहे. अशातच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून परिसरातील काही शेतकऱ्यांनी भाजीपाला वर्गीय पिकांचे संगोपन केले आहे. परंतु, सध्या ढमस या भाजीपाला वर्गीय पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने सदर पिकाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.उन्हाळ्याच्या दिवसात चिकणी व परिसरातील काही शेतकरी भाजीपाला वर्गीय पीक घेतात. यात मिरची, पालक, ढमस आदींचा समावेश असतो. शेतकरी भाष्कर काकडे यांनी विविध भाजीपाला वर्गीय पिकाची लागवड यंदा केली आहे. यात ढेमस, भेंडी, कार्ली यांचा समावेश असून काही शेत जमिनीवर जनावरांचा चारा म्हणून मकाची लागवड करण्यात आली आहे. शेतातील विहिरीच्या पाणी पातळीत घट झाल्याने त्यांनी २० हजार रुपये खर्च करून विहिरीला गाळमुक्त केले. शिवाय उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून या पिकांचे संगोपन केले. परंतु, मागील पाच ते सहा दिवसांपासून ढेमसाच्या वेलीचे पान करपत आहेत. त्यामुळे उत्पादनातही घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ढेमस या पिकावर आलेला हा रोग कोणता. त्याचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी आता काय करावे, असा प्रश्न सध्या शेतकऱ्याला भेडसावत आहे. हे पीक सध्या फळ धारणावस्थेत असून कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.भावही समाधानकारकफळ धारणावस्थेत असलेल्या ढेमस पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने सध्या ढेमसाच्या वेलीचे पाने अचानक करपत आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. असे असले तरी सध्या बाजारपेठेत ढेमस या भाजीपाला वर्गीय पिकाला समाधानकारक भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगण्यात.
ढेमसावर अज्ञात रोगाचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 9:58 PM