निवेदन : मुकेश भिसे यांचे कृषिमंत्र्यांना साकडे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पीक विमा योजना ही वर्धा जिल्ह्यात विमा कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. शेतकऱ्यांनी पीकनिहाय विमा मोठ्या प्रमाणात काढला; पण त्याचा लाभ त्यांना झाला नाही. याकडे लक्ष देत पीक विमा कंपन्यांची चौकशी करावी, अशी माणगी जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे यांनी केली. याबाबत राज्य कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांना निवेदनही सादर करण्यात आले. जिल्हास्तरीय खरीप पीक नियोजन आढावा बैठकीत या प्रश्नांवर आ. समीर कुणावार व इतर पदाधिकाऱ्यांनी माहिती विचारली. यावर पीक विमा कंपन्यांकडील केवळ एका रिलायंस विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील ७२६ प्रकरणांपैकी केवळ २२ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देय आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात सर्व्हे न करता कृषी सहायकांनी केला. वर्धा जिल्ह्यातून ९६ हजार १७७ शेतकऱ्यांनी सुमारे १४.८६ कोटी रुपयांचा विमा हप्ता विमा कंपन्यांना अदा केला. यातील केवळ २२ शेतकरी पात्र ठरले असून ६ शेतकऱ्यांना ८४ हजार ५७९ रुपये प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. यावरून विमा कंपन्या शेतकऱ्यांची कीत लूट करीत आहे, हे दिसून येते. कोणत्याही विमा कंपन्यांचे जिल्हा व तालुका स्थळी कार्यालय नाही. यामुळे शेतकऱ्यांनी संपर्क कुणाकडे करावा, हा प्रश्नच आहे. या प्रकरणी शहानिशा करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विमा कंपन्यांमार्फत होणारी लूट थांबवावी. शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही पांडुरंग फुंडकर यांना कृषी सभापती भिसे यांनी केली आहे.
पीक विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करा
By admin | Published: May 21, 2017 1:06 AM