राज्य महामार्गावरील प्रकार : कडा भरण्याची मागणी सेलू : रस्त्यावर खड्डे हा प्रकार नित्याचाच झाला आहे. त्यामुळे प्रवासी व वाहन धारकांना मनस्ताप सहन करावा लागतो. वर्धा ते नागपूर या राज्यमार्गावरील कडा खचल्या असून ही बाब अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. बोरनदी पुलाच्या परिसरात रस्त्याच्या कडा खोलगट असल्याने तेथे भरावा देण्याची मागणी होत आहे. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात जडवाहतूक व प्रवासी वाहतूक होते. दिवसाला हजारो वाहने या रस्त्याने धावतात. त्यातच रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. या मार्गावरील वाहनांची वर्दळ पाहता प्रसंगी वाहन रस्त्याच्या खाली उतरावे लागल्यास अपघाताचा धोका असतो. रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत हा रस्ता येतो. मात्र रस्त्याच्या कडा त्यांच्या नजरेतून सुटल्या कशा असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करतात. रस्ता चांगला असावा, रस्त्याने जाताना वाहनधारकांना अडचण जाणार नाही, वाहतूक सुरळीत राहावी, अपघात घडू नये याची काळजी घेण्याची गरज असताना या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. डांबरीकरणाच्या बाजूला मुरूम टाकण्याची आवश्यकता असताना कडा भरण्यात आल्या नसून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.(शहर प्रतिनिधी) बोरनदीच्या पुलावरील दोन्ही बाजुच्या कडा भरण्यात आल्या माही. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकाला प्रसंगी वाहन रस्त्याच्या खाली घायचे असल्यास कोणताच पर्याय नाही. रस्त्याच्या बाजू खोलगट असल्याने वाहन धारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. कधीतर वाहन ओव्हरटेक करताना अंदाज झाला नाही तर अपघाताला निमत्रण मिळते. रस्त्याच्या डागडूजीवर लाखो रूपये खर्च करणाऱ्या प्रशासनाला रस्त्याच्या कडा भरण्याचा आजवर विसर पडल्याचे दिसते. कडा भरण्याकरिता लागणारा खर्च करणे शासनाला अवघड आहे काय, असा प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित होतो. येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याने संबंधीत विभागाने याकडे त्वरीत लक्ष देत रस्त्याच्या कडा भरण्याची गरज व्यक्त होत आहे.
रस्त्याच्या खचलेल्या कडा अपघातास निमंत्रण
By admin | Published: April 15, 2017 12:30 AM