झडशी : ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या बिकट आहे़ शिवाय सिंचनाचीही फारशी सोय नाही़ ही समस्या दूर करण्याकरिता पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबविण्यात आली़ या अंतर्गत बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली; पण हे बंधारे सध्या निकामी झाले आहे़ बंधाऱ्याचे लोखंडी गेट, पाट्या चोरीला गेल्या असून अनेक ठिकाणी हे साहित्य बेवारस पडले आहे़ असा प्रकार पंचधारा नदीवरील बंधाऱ्याबाबत घडत असून तेथे पाणीच अडत नसल्याचे दिसते़लघु पांटबंधारे विभाग व पाटबंधारे विभाग यांच्यामार्फत ग्रामीण तसेच जंगल भागातील नदी नाल्यावर वनराई बंधारे व साठवण बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले़ शेत शिवारातील नदी नाल्यावरही बंधाऱ्यांची निर्मिती करून पाणी अडविण्यात आले़ यामुळे पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली़ गुरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्याही निकाली निघाली़ शिवाय शेतातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली़ यामुळे ओलिताची सोय झाली़ शेत शिवारातील नदीवर बंधारे बांधत असताना परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करून समिती स्थापन करण्यात आली़ बंधारा देखभालीसह गेट उघडणे, बंद करणे, ही कामे या समितीकडे सोपविण्यात आली़काही वर्षांपूर्वी पंचधारा नदीवर हिवरा येथे मोठा साठवण बंधारा बांधण्यात आला़ यास लोखंडी गेट लावण्यात आले़ या गेटच्या देखभालीची जबाबदारी परिसरातील समितीवर सोपविण्यात आली; पण समिती व लघु पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे बंधाऱ्याचे काही लोखंडी गेट वाहून गेले तर काही वाहून जाण्याच्या मार्गावर आहे़ समिती व संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. हिवरा येथील बंधाऱ्यात पाणीच अडच नसल्याने तो निरूपयोगी ठरत आहे़ या बंधाऱ्याचे गेट बेवारस आहेत़ संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़(वार्ताहर)
पंचधारा नदीवरील बंधाऱ्याचे लोखंडी गेट बेवारस
By admin | Published: June 26, 2014 11:27 PM