जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दुकानावर कार्यवाहीची मागणी वर्धा : धोत्रा (रेल्वे) येथील स्वस्त दुकान मालक राजेंद्र आत्राम यांच्याकडून अनेक गैरप्रकार होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यात त्यांना महिन्याला आवश्यक असलेला धान्यसाठा मिळत नाही. यामुळे सदर दुकान मालकावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. धोत्रा (रेल्वे) येथील ग्रामस्थांना महिन्याचे धान्य बरोबर मिळत नाही. स्वस्त धान्य दुकानदार मालाची बिल, पावती देत नाही. महिन्याच्या धान्याची २५ तारखेनंतर उचल केली जाते आणि ३० तारखेनंतर तुमचा माल नेण्याची मुदत संपलेली आहे, आता तुम्हाला धान्य मिळणार नाही, असे स्पष्ट सांगितले जाते. गावातील अर्धेधिक ग्रामस्थ दारिद्र्य रेषेखालील आहेत. त्यांच्याकडे धान्य घेण्यासाठी वेळेवर पैसा राहत नाही. यामुळे धान्य खरेदी करण्यास विलंब होतो. नेमका याचाच फायदा स्वस्त धान्य दुकानदार घेतो. दोन ते तीन दिवसांनी धान्य खरेदीसाठी गेले असता माल संपला, असे सांगतो. शिवाय खुल्या बाजारात अधिक रकमेत शासकीय धान्य विकत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. गावातील लोक धान्य घेण्यसाकरिता स्वस्त धान्य दुकानात गेले असता त्यांचा भाचा व आई नागरिकांना उद्धट वागणूक देत असल्याचा आरोपही केला आहे. नेहमी त्याची आईच घरी असते आणि ग्रामस्थांना दुकानदार बाहेर गेला, असे सांगितले जाते. बहुतांश दिवस स्वस्त धान्य दुकान बंद असते. शिधापत्रिका धारकांसाठी नवीन अन्नदायी योजना सुरू झाली आहे. त्या योजनेची यादी स्वस्त धान्य दुकानामध्ये लावण्यात आली नाही. शासनाकडून येणाऱ्या सूचनांचा फलकही लावला जात नाही. यापूर्वी नागरिकांनी ग्रामपंचायत धोत्रा रेल्वे येथे सह्यांसह तक्रार केली होती. यात मालाचे बिल व पावती मिळत नसल्याचे नमूद केले होते. या तक्रारीची ग्रा.पं. प्रशासनाने गंभीर दखल घेत मासिक ठरावासह या प्रकरणी संबंधित तहसील कार्यालय वर्धा येथे तक्रार दाखल केली होती; पण सस्त धान्य दुकानदाराने हे प्रकरण पैशाच्या जोरावर दडपले. ग्रामस्थ २ जानेवारी रोजी स्वस्त धान्य दुकानामध्ये गेले असता धान्य संपले, माल उचलण्याची तारीख गेली आहे, असे सांगून परत पाठविले. यात कमल महंता चिचघाटे, राजेंद्र रामदास कांबळे, बेबी देविदास शेंडे यांचा समावेश आहे. या नागरिकांची आर्थिक स्थिती हलाखीची असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितावर कार्यवाही करून धान्य मिळवून देण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
धोत्रा (रेल्वे) येथे स्वस्त दुकानदाराची अनियमितता
By admin | Published: February 05, 2017 12:42 AM