लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शासनाने नदी, खोरे पुनरूज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे चार वर्षे मुदत असलेल्या या प्रकल्पातून ४० टक्के काम पूर्णत्वास गेले असून उर्वरित कामेही प्रगतिपथावर आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या नदीच्या माध्यमातून चार तालुक्यातील तब्बल ८३ हजार ९३ हेक्टरमधील शेती सिंचीत होऊ शकणार आहे.आर्वी तालुक्यातील विरूळ (आकाजी) येथून उगम पावलेली यशोदा नदी हिंगणघाट तालुक्यातील शिरसगाव (येरणगाव) येथे वर्धा नदीला जाऊन मिळते; पण मागील काही वर्षांत यशोदा नदी लुप्त झाल्याचेच दिसून येत आहे. या नदीला नाल्याचे तथा झुडपी जंगलाचे स्वरूप आले होते. यामुळे जिल्ह्यातील एक मोठा जलस्त्रोत मृत होण्याच्या मार्गावर होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदी खोरे पुनरूज्जीवन प्रकल्प हाती घेतला. यात वर्धा जिल्ह्यातील यशोदा नदी पुनरूज्जीवन प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आलेला आहे. यात ५५ टक्के वाटा शासनाचा, ४० टक्के वाटा रतन टाटा ट्रस्ट आणि जमनालाल बजाज फाऊंडेशनचा तर पाच टक्के वाटा लोकसहभागातून जमा करायचा आहे. या प्रकल्पामध्ये वर्धा तालुक्यातील ७५, देवळी तालुक्यातील ५५, आर्वी तालुक्यातील दोन तथा हिंगणघाट तालुक्यातील २१ अशी १५३ गावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. २०१७-१८ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाला चार वर्षे म्हणजे २०२२ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.सध्या कमलनयन बजाज फाऊंडेशनच्यावतीने यशोदा नदीला मिळणाऱ्या नाल्यांच्या खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. वर्धा तालुक्यातील चिकणी, जामणी तथा अन्य एका गावातील नाल्यांच्या खोलीकरण तथा सरळीकरणाची कामे करण्यात आलेली आहेत. या कामांमुळे मृत जलस्त्रोत जिवंत होत असल्याचे तथा जलसंचय होत असल्याचेही पाहावयास मिळत आहे. याच प्रकल्पांतर्गत वर्धा नदीच्या पात्राच्या खोलीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे. हे काम नांदोरा (डफरे) येथे सुरू करण्यात आले असून अन्य गावांतही कामे केली जात आहेत.शासन, रतन टाटा ट्रस्ट व जमनालाल बजाज फाऊंडेशनने हाती घेतलेल्या यशोदा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पामुळे सिंचनाच्या क्षेत्रात लक्षनिय वाढ होणार आहे. असेच प्रकल्प जिल्ह्यातील अन्य नद्यांबाबत राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. वर्धा नदीचे पात्रही अनेक ठिकाणी उधळ झाले असून केरकचरा साचलेला आहे. शिवाय नालेही बुजण्याच्या स्थितीत आहेत. बोर, वणा नदीचेही तसेच हाल होत आहे. या नद्या मोठ्या जलस्त्रोत असल्याने त्यांचा विचार होणेही गरजेचे झाले आहे.वर्षभरात ४० टक्के कामे झाली पूर्णचिकणी (जामणी) - जलयुक्त शिवार अंतर्गत राबविल्या जात असलेल्या यशोदा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाची कामे चिकणी, जामणी परिसरात धडाक्याने करण्यात आली. या भागात यशोदा नदीला मिळणाऱ्या नाल्यांचे खोलीकरण, सरळीकरण करण्यात आले आहे. कमलनयन बजाज फाऊंडेशनच्यावतीने ही कामे केली जात असून एक वर्षात ४० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे तीन वर्षात पूर्ण होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये बजाज फाऊंडेशनकडून हा प्रकल्प राबविला जात आहे. यात वर्धा, देवळी, हिंगणघाट आणि आर्वी तालुक्याचा समावेश आहे. एकूण १५३ गावांत सदर प्रकल्प राबवित असून २०२२ मध्ये ही कामे पूर्ण होतील, असे सांगण्यात आले आहे.पावसाळ्यापूर्वी देवळी शहरातील कामे गरजेचीदेवळी - जिल्ह्यातील आर्वी, देवळी, वर्धा व हिंगणघाट तालुक्यातून वाहणारी यशोदा नदी अनेक ठिकाणी बुजली आहे. काही ठिकाणी केरकचरा तर काही ठिकाणी पात्राचे रूपांतर झुडपी जंगलात झाल्याचे दिसून येत आहे. देवळी येथे यशोदा नदीवरच स्मशानभूमी आहे. या ठिकाणी यशोदा नदीचे पात्र आहे की नाही, असाच भास होतो. या भागात नदीचे रूपांतर नाल्यात तथा झुडपी जंगलात झाल्याचे दिसून येते. शिवाय रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाही यशोदा नदीच्या पात्रात केवळ झुडपांचेच साम्राज्य दिसून येते. यामुळे देवळी तालुक्यातील यशोदा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पातील कामे प्रथम हाती घेणे गरजेचे झाले आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे झाल्यास मोठ्या प्रमाणात जलसंचयास मदत होणार असून शेतकºयांचे दरवर्षी पुरामुळे होणारे नुकसानही टाळता येणार आहे.
यशोदातून होणार ८३ हजार हेक्टरचे सिंचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:35 PM
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शासनाने नदी, खोरे पुनरूज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे चार वर्षे मुदत असलेल्या या प्रकल्पातून ४० टक्के काम पूर्णत्वास गेले असून उर्वरित कामेही प्रगतिपथावर आहेत.
ठळक मुद्दे१०० कोटींच्या खर्चातून १५३ गावांत होणार कामे