चैतन्य जोशी
वर्धा : अवकाशातून पडलेल्या वस्तूंच्या तपासणीसाठी अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोचे शास्त्रज्ञ वर्धा जिल्ह्यात दाखल झाले आहेत. २ एप्रिल रोजी लाखो लोकांनी अवकाशात आगीचे लोळ उठताना बघितले होते. यातून वस्तू स्वरुपात समुद्रपूर तालुक्यातील दोन गावे आणि हिंगणघाट तालुक्यातील दोन गावांत धातूची रिंग आणि काही सिलिंडरसारखे दिसणारे गोळे सापडले होते. नागरिकांत दहशत पसरली असतानाच जिल्हा प्रशासनाच्या पत्रानंतर इस्त्रोचे पथक सहा दिवसानंतर जिल्ह्यात दाखल झाले. २ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अवकाशात आगीचे लोळ उठल्याचे नागरिकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले.
हे दृष्य पाहून नागरिकांच्या पायाखालची जणू जमिनच सरकली होती. अनेक तर्क वितर्क नागरिकांकडून लावल्या गेले. अनेकांनी मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. पाहता पाहता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. दुसऱ्या दिवशी अवकाशातून पडलेल्या काही वस्तू समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर काही वस्तू गिरड तसेच हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये पडल्याचे समजले. पोलिसांनी अवकाशातून पडलेल्या वस्तू ताब्यात घेत. इस्त्रोशी पत्रव्यवहार केला. इस्त्रोचे शास्त्रज्ञ शाहजहान एन. आणि मयुरेश शेट्टी ही दोन शास्त्रज्ञांची चमू समुद्रपूर येथे ८ रोजी रात्री दाखल झाली. त्यांनी १ सिलिंडरसारखी वस्तू तपासणीसाठी ताब्यात घेतली. तर शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गिरड पोलीस ठाणे गाठून २ गोळे ताब्यात घेतले. तर हिंगणघाट पोलिसांकडून अवकाशातून पडलेले धातुच्या रिंगचे पत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दोन्ही शास्त्रज्ञांनी संपूर्ण वस्तूंची पाहणी केली. इस्त्रोच्या वाहनातून यासर्व वस्तू तपासणीसाठी नेल्या जाणार आहे. त्याचे परिक्षण केल्यानंतर या वस्तूबाबत नेमका अहवाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अवकाशातून पडलेल्या वस्तू पोलिसांनी घेतल्या होत्या ताब्यात
२ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी अवकाशात आगीचे लोळ उठताना पाहिले. दुसऱ्या दिवशी समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा आणि धामणगाव परिसरातील शेतात अवकाशातून पडलेल्या २ सिलिंडरसारख्या वस्तू मिळून आल्या. तसेच गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धामणगाव गाठे परिसरात २ सिलिंडरच्या आकाराचे गोळे आढळून आले. तसेच हिंगणघाट तालुक्यातील भोईपुरा आणि आजंती शिवारात धातुच्या रिंगचे काही तुकडे पडलेले आढळून आले. पोलिसांनी यासर्व वस्तू ताब्यात घेत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या ताब्यात तपासणीसाठी दिल्या.