लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र सरकारने यावर्षी कापसाला हमीभाव ५ हजार ८२५ रुपये जाहीर केला आहे. शेतकऱ्याचा कापूस निघण्यास सुरूवात झाली असून अजूनपर्यंत केंद्र व राज्य शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत धोरण निश्चित केलेले नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची आशा मावळली आहे. त्याचा लाभ व्यापारी घेण्याची शक्यता असून यंदाही कमी भावात खरेदीचे दृष्टचक्र थांबण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या वर्षी वर्धा जिल्ह्यात सीसीआयने ३२ लाख क्क्ंिटल कापूस जूनअखेरपर्यत खरेदी केला होता. त्यांनी नाकारलेला कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केला.केंद्रीय कापूस मंडळ किंवा फेडरेशन १२ टक्क्यांपेक्षा कमी आर्र्द्र्रतेचाच कापूस खरेदी करते. आर्द्रता अधिक असल्यास कापूस नाकारला जातो. हाच कापूस मग चार हजार रुपये क्विंटलच्या आसपास व्यापारी खरेदी करतात. गतवर्षी ४ लाख क्विंटल कापूस राज्यात खरेदी झाला. त्यापैकी निम्मा सरकार तर निम्मा व्यापाऱ्यांनी खरेदी केला. अर्थात हा सरकारने नाकारल्यावर व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विकला गेला यंदा सीसीआयने चार खरेदी केंद्र जिल्ह्यात सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रीया राबविली यात वर्धा मुख्यालयातील केंद्राचा समावेश नाही. सीसीआयची खरेदी दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता नाही.
यंदा अधिकमास असल्याने विजयादशमी २५ ऑक्टोबरला आहे. गतवर्षी ८ ऑक्टोबरला होती. म्हणजेच दसरा यावर्षी १७ दिवस उशिरा आहे. मात्र यंदा कापसाची पेरणी लवकर झाल्याने वेचाई सुरू झाली आहे. गतवर्षी व्यापाऱ्यांनी दसऱ्याचे मुहूर्त साधून सहा हजार रुपये प्रति क्विंटलने कापूस खरेदी केला होता. पण यावर्षी साडेचार हजार रुपयांपेक्षा व्यापारी अधिक भाव देणार नाही, असा अंदाज जाणकार व्यक्त करतात. त्यामुळे दसऱ्याला खरेदी सुरू न झाल्यास शेतकऱ्यांना कमी भावात गरजेपोटी कापूस विकावा लागणार आहे.
सीसीआयची कापूस खरेदीसाठीची प्रक्रिया पूर्ण झाली असून बाजार समितीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणीही केली आहे. सीसीआयने ९ नोंव्हेंबरपर्यंत कापूस खरेदी करणे आवश्यक आहे, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अॅड. सुधीर कोठारी यांनी दिली आहे.