सुरेश शिंदे : ‘एक रात्र कवितेची’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्धहिंगणघाट : ‘कागदाला काळं करण्याइतकं सोप असतं का मातीला हिरवं करणं, इथे मढं झाकून जीवच वापश्यावर पेरावा लागतो. बाबांनो तुमच्या आकड्यांना आणि अक्षरांना जर कणसं आली असती तर आमच्या डिग्य्रांना वाळकी लागली नसती.’ प्राचार्य सुरेश शिंदे यांनी आपल्या कवितेतून शेतकऱ्यांची मांडलेली भेदक व्यथा सर्वांनाच अंतर्मुख करून गेली. प्रसंग होता लोकसाहित्य परिषदेने आयोजित केलेल्या ‘एक रात्र कवितेची’ या कार्यक्रमाचा. हिंगणघाट येथे आयोजित काव्यमैफलीमध्ये अशोक नायगावकर, मुंबई, प्रा. सुरेश शिंदे, मंगळवेढा, शंकर बढे व जयंत चावरे, यवतमाळ यांनी आपल्या कविता व किस्स्यांनी श्रोत्यांना मनमुराद हसविले आणि रडविलेही.स्व. शरद जोशी परिसर व स्व. मंगेश पाडगावकर वैचारिकपीठावर आयोजित काव्यमैफलीचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे यांनी केले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रा. उषा थुटे, नायब तहसीलदार अरविंद हिंगे, डॉ. राजेंद्र कडुकर, नितीन पखाले, प्रा. शेषकुमार येरलेकर, राजेंद्र डागा, यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक लोकसाहित्य परिषदेचे सचिव ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले. शंकर बढे यांनी मैफलीचे संचालन करीत वऱ्हाडी बोलीतून कविता सादर केल्या. कवी जयंत चावरे यांनी नव्या दमाच्या कविता सादर करीत मैफलीत रंग भरला.‘पिल्लू ठेऊन खोप्यात, चिऊ निघते चाऱ्याले, कोठ्यामंदी काळी गाय चाटे वासराले, हे पाहून वाटते माय असावी साऱ्याले’, तसेच ‘माय देवकीचा पान्हा माय यशोदेचा कान्हा, लेक असो किती मोठा मायेसाठी तो तान्हा’ ही आईवरची कविता जयंत चावरे यांनी सादर करून आई आणि लेकरांचे प्रेम व्यक्त केले. प्रा. सुरेश शिंदे यांनी ‘मताचे पीक भरघोस हवे असेल तर दुष्काळात कायम होरपळणारी जमीन निवडावी, कणसात दाणे भरू लागल्यात, शंभर शंभर शंभर किंवा पाचशे पाचशे पाचशे रासायनिक खतांची शेवटची मात्रा देऊन प्रवाही करावी म्हणजे मतांचे पीक भरघोस येते’ ही कविता सादर करून शेतकरी आत्महत्येचे वास्तव मांडले. कवी अशोक नायगावकर यांनी श्रोत्यांना मनमुराद हसविले. मुंबई पुण्याचे अनेक किस्से सांगताना त्यांच्या समस्याही मांडल्या. माझ्या कविता स्वप्न रंजन करणाऱ्या नाही तर वास्तविकता मांडणाऱ्या आहेत. दररोजच्या जगण्यातल्या असल्याचे अनेक कवितांमधून मांडले. संचालन लोकसाहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. अभिजित डाखोरे, तर आभार मनोहर ढगे यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजेंद्र चाफले, राजेंद्र कोंडावार, गिरीधर काचोळे, नितीन सिंगरू, दुर्गा सहारे, आशिष भोयर, प्रा. महेंद्र घुले, चंद्रकांत उटाणे, संजय मानकर, विकास मानकर, विजया ढगे, सुमन शेंडे आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
कागदाला काळं करण्याइतकं सोपं असतं का मातीला हिरवं करणं
By admin | Published: January 21, 2016 2:07 AM