लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वातंत्र्यपूर्व काळात देशावर सत्ता जरी इंग्रजांची होती तरी कोट्यावधी जनतेच्या मनावर अधिराज्य गांधींचेच होते. त्या काळात स्वातंत्र्य लढ्यासोबतच गांधींचे रचनात्मक कार्यही सतत सुरू होते; पण याच कार्याचा समाजाला विसर पडला आहे. साहित्य, कला, संगीत, कारागिरी, पर्यावरण, पत्रकारिता, आरोग्य, विज्ञान अशा अनेक अंगाने त्या काळातही गांधींचा लोकांवर प्रभाव होता, असे प्रतिपादन गांधी विचारक आणि साहित्यिक डॉ. रामदास भटकळ यांनी केले.महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम आश्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, विदर्भ साहित्य संघ शाखा वर्धा व यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्यावतीने ‘गांधी विचार आणि मराठी साहित्य’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, लेखक रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ, प्रा. डॉ. राजेंद्र मुंढे, डॉ. इंद्रजीत ओरके, डॉ. विलास देशपांडे, संजय इंगळे तिगावकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.भटकर पुढे म्हणाले, गांधी केवळ जनतेच्या भावनेला हात घालत नव्हते, तर ते मानवी समूहाचे आणि समूहाच्या मानसिकतेचेही उत्कृष्ट अभ्यासक होते. गांधी वैज्ञानिक व बुद्धिवादीही होते. म्हणूनच आइनस्टाईन आणि बर्ट्रान रसेल गांधींबद्दल सतत आदर व्यक्त करतात. साधनांच्या वापरापासून तर साधन शूचितेपर्यंतचा गांधींचा प्रवास अवघड होता. गांधींच्या दृष्टीने धर्म म्हणजे नैतिकता. माणसाने आपला धर्म सोडू नये, असे जेव्हा गांधी म्हणत तेव्हा त्यांना रुढार्थाने धर्म म्हणायचा नव्हता, तर नैतिकतेचे प्रत्येकाने पालन करावे इतकेच सांगायचे होते. सर्वांगीण विचार, सर्वोदय, सर्वहारांचे सुख हाच गांधीविचारांचा पाया आहे. म्हणूनच गांधी विचारांचा प्रभाव वर्षानुवर्षे जनमानसावर राहणारच असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.गांधीजी इतक्या साºया विश्वाने स्वीकारलेल्या महात्म्याला सुरुवातीला मराठी माणसाने स्वीकार करायला कुचराई केली. महाराष्ट्रातील गुणवंतांनी गांधी हे बहुजनांचे आहे, बुद्धीवादी नाहीत म्हणून स्वीकार केला नाही. आता हे गुणवंत किती बुद्धिवंत होते हा प्रश्न कालोतिहासात गडप झाला असल्याचेही यावेळी भटकर म्हणाले.रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी गांधी विचारांचा आजच्या काळात अन्वयार्थ लावणे आणि आजच्या तरुणांच्या प्रश्नांना गांधी विचारांशी जोडणे, ही काळाची गरज असल्याचे सांगितले. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मराठी साहित्यावर गांधींचा प्रभाव नाही तर मग काय टिळकांचा आहे का? मार्क्सचा तरी प्रभाव मराठी साहित्यावर किती आहे? मुळातच साहित्याचे प्रयोजन जागा सुंदर करण्याचे न मानता ते केवळ प्रतीतीविश्रांती मानत उत्तरकर्तव्योन्मुखता नाकारणारे भारतीय साहित्यशास्त्र हे वैचारीकतेचे व सृजनाचे नातेच स्थापू देत नाही. गांधीनी प्रत्यक्ष उपाययोजनच केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.दुसºया सत्रात डॉ. अजय देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. या चर्चासत्रात डॉ. किशोर सानप, किशोर बेडकिहाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र मुंडे यांनी केले. संचालन प्रा. एकनाथ मुरकुटे व पद्माकर बाविस्कर यांनी तर आभार संजय इंगळे तिगावकर व डॉ. विलास देशपांडे यांनी मानले.
बापूंच्या खऱ्या कामाचा विसर हीच सध्या चिंतेची बाब आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:34 AM
स्वातंत्र्यपूर्व काळात देशावर सत्ता जरी इंग्रजांची होती तरी कोट्यावधी जनतेच्या मनावर अधिराज्य गांधींचेच होते. त्या काळात स्वातंत्र्य लढ्यासोबतच गांधींचे रचनात्मक कार्यही सतत सुरू होते; पण याच कार्याचा समाजाला विसर पडला आहे.
ठळक मुद्देरामदास भटकळ : ‘गांधी विचार आणि मराठी साहित्य’ वर चर्चासत्र