राजश्रीदीदी चौधरी : ‘समाज सुधारकांचे विचार किती गरजेचे’ विषयावर व्याख्यानमालाहिंगणघाट : आजच्या विज्ञान युगात आमच्या युवा पिढीने खूप प्रगती केली. त्यांच्यामध्ये वैचारिक बदल आला. राष्ट्रभक्ती ही दिखाव्याची नसून समाज सुधारकांच्या विचाराची कास धरून ते विचार नवीन पिढीवर कसे बिंबवता येईल. त्यातून स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, आई जिजाऊ या प्रत्येक घरी कशा तयार होतील, यावा विचार करणे आज गरजेचे आहे, असे मत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पंती राजश्रीदीदी चौधरी यांनी व्यक्त केले.भारतीय युवा संस्कार परिषद व भारतीय बहुउद्देशीय युवा संस्कार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत कंवरराम भवनात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अॅड. मुरलीमनोहर व्यास होते. याप्रसंगी राजश्रीदीदी पूढे म्हणाल्या की, आम्ही भारतीय लोक जयंत्या व पुण्यस्मरणात जयघोष करून राष्ट्रीय थोर महापुरूषांचे दिन साजरे करतात. हे करणे म्हणजे त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे नव्हे. ते प्रत्यक्ष जीवनात कसे आचरणात आणता येईल, हे महत्त्वाचे आहे. पिढी बदलली असली तरी थोर महात्म्यांचे विचार अंगिकारल्यानेच भारत जगात पुन्हा सामर्थ्यवान होणार आहे. यामुळे त्यांचे विचार आत्मसात कणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. बसंतानी यांनी, ही व्याख्यानमाला मागील १८ वर्षांपासून हिंगणघाट सारख्या शहरात युवा पिढीला नवीन दिशा देत आहे, असे सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी तसेच वर्धा नागरी बँकेचे नवनिर्वाचित संचालक भीमसागर खैरकर यांनी विजयाची हॅट्ट्रीक केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रामुख्याने वसंत महाराज पेठे, प्रमिला खंडेलवाल, डॉ. मधुसूदन गोयनका, डॉ. प्रकाश लाहोटी, प्रा. खडसे, अभिजीत डाखोळे, रमेश झाडे, लिला पोतनिस, अॅड. हेमके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत भूमिका डॉ. शरद कुहीकर यांनी मांडली. परिचय प्रदीप नागपूरकर यांनी करून दिला. संचालन अंकिता सोनटक्के यांनी केले तर आभार गजानन नांदुरकर यांनी मानले. ज्योती कोहचाडे यांनी गायिलेल्या वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली. यशस्वीतेकरिता अरूंधती बघमारे, आचल व वैष्णवी सायरे, तारा बघमारे, तनैया वनकर, धर्मेंद ढगे, ईश्वरी बघमारे, नरेंद्र पोहणकर, मनोहर शेंडे, मिल्कीराम डाहारे, श्रूती कोहचाडे, प्रभाकर मांढरे, मोतीराम मून, केशवराव नक्षिणे, नईम मलिक, अब्दुल हसन, मिलिंद मुळे, मंजूषा सागर, छकुली इंगोले, कावेरी जाचक, गौरव मेश्राम, नितीन हिवंज, गौरव बघमारे आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)हल्ली समाजसुधारकांचे विचार कालबाह्य स्वातंत्र्यपूर्व काळात स्वामी विवेकानंद, आई जिजाऊ, नेताजी सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या कृतीतून राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण संविधानाच्या गोष्टी सांगत आहोत. ते संविधान जर टिकवायचे असेल तर आपल्यातही त्यांचे विचार आत्मसात करून आपले सामर्थ्य, विचार उतरविण्याची गरज आहे. हल्ली समाज सुधारकांचे विचार कालबाह्य झाल्याचे दिसते. ते विचार प्रत्येकाच्या मनात रूजविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मतही राजश्रीदीदी चौधरी यांनी व्यक्त केले.
नवीन पिढीवर सुधारकांचे विचार बिंबविणे गरजेचे
By admin | Published: February 07, 2017 1:11 AM