वर्धा: वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. त्यांनी देशाला एक विचारसरणी दिली आहे. त्यांच्या विचारानुसारच ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना भाजपाने देशात रुजविली. इतकेच नाही तर खादीला प्रोत्साहन देऊन मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मितीचे कामही केले आहे. काँग्रेसने केवळ गांधीजींच्या नावाचा वापर करुन राजकारण केले असून, भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारनेच खऱ्या अर्थाने गांधींजींच्या विचाराचा भारत घडविला, असा घणाघात केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा कार्यक्रम व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ९ वर्षानिमित्त महा-जनसंपर्क अभियानांतर्गत केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सरकारच्या कार्याचा आढावा घेताना ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, सर्व काही संभव आहे, त्याकरिता देशाचा नेता सच्चा आणि कर्तव्यदक्ष असणे आवश्यक आहे. आता या मोदी सरकारला रोखण्याकरिता घोटाळेबाज एकत्र यायला लागले आहे. कुणी जनावरांचा चारा गिळला, कुणी भूखंड हडपले, कुणी नोकरीच्या बहाण्याने पैसा लाटला तर कुणी जीजा घोटाळाही केला आहे. पण, या ९ वर्षांमध्ये कोणताही घोटाळा झाला नसून एक इमानदार सरकार दिली आहे. तब्बल साडेतीन कोटी नागरिकांना पक्के घरे दिली आहे. ९ कोटी ६० लाख महिलांची चूल फुंकण्यातून सुटका करून उज्ज्वला गॅस योजनेतून मोफत सिलिंडर दिले आहेत. १२ कोटी घरांना नल से जल दिलं आहे. इतकेच नाही तर कोरोनाकाळामध्ये ८० कोटी नागरिकांना दुप्पट रेशन पुरविण्याचे कामही या सरकारने केले आहे. असंभव असं कामही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने संभव करून हे जनतेचं सरकार आहे, असा विश्वास दिला आहे, असेही अनुराग ठाकूर या वेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, लोकसभा संपर्कप्रमुख सुमित वानखेडे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, आमदार दादाराव केचे, आमदार डॉ. रामदास आंबटकर, आ. समीर कुणावार, आ. प्रताप अडसड, माजी जि.प. अध्यक्ष सरिता गाखरे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, राजेश बकाणे, माजी खासदार सुरेश वाघमारे, संजय गाते, आशिष कुचेवार यांची उपस्थिती होती.