देऊरवाडा (जि. वर्धा) / अकोला : आयुर्वेदिक व युनानी डॉक्टरांना बोगस अथवा भोंदू संबोधणे आता महागात पडणार आहे. माध्यमांमध्ये अथवा सोशल मीडियावर या डॉक्टरांना भाेंदू अथवा बोगस डॉक्टर म्हटले गेल्यास नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक कायद्यानुसार गुन्हा ठरणार असल्याचे आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच आयुर्वेदिक डॉक्टरांच्या वैद्यकीय विकास मंच व अस्तित्व परिषद या संघटनांना तशा सूचना दिल्या आहेत.
आपल्याकडे पूर्वीपासून केवळ एमबीबीएस डॉक्टरांनाच सरकारी यंत्रणेने महत्त्व दिले. यामुळे सरकारी मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेऊनही आयुर्वेदिक व युनानी डॉक्टरांच्या वाट्याला कायम उपेक्षाच आली. या डॉक्टरांना कधीही सरकारच्या आरोग्य विभागात स्थान मिळाले नाही. उलट ॲलोपॅथी डॉक्टरांकडून माध्यमांमध्ये या डॉक्टरांना भोंदू अथवा बोगस म्हणून हिणवले जात होते. मात्र, केंद्र सरकारने आयुष मंत्रालयाची स्थापना करत ॲलोपॅथीप्रमाणेच यासुद्धा प्रमाणित वैद्यकीय शाखा असल्याचे जाहीर केले असून, त्यांच्यातील भेदभाव नष्ट केला आहे. मात्र, सामाजिक स्तरावरील भेदभावाची मानसिकता अद्याप बदललेली नसल्याने आयुर्वेदिक व युनानी डॉक्टरांना सर्रास बोगस वा भाेंदू म्हणून हिणवले जाते.
याबाबत आयुर्वेदिक व युनानी डॉक्टरांच्या विविध संघटनांनी आयुष मंत्रालयाला साकडे घातले होते. आयुष मंत्रालयाने १७ फेब्रुवारी रोजी याबाबत परिपत्रक जारी केले असून, आयुर्वेद व युनानी डाॅक्टरांचा बोगस अथवा भोंदू म्हणून उल्लेख करणे, हा गुन्हा असल्याचे म्हटले आहे.