राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा (आर्वी) : वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केलेले जाणारे गतिरोधक नियमबाह्य उंचीमुळे अनेकदा वाहन चालकांच्या जीवावर उठत आहेत. शहरात गतिरोधक बसविताना ना उंचीचा नियम पाळला ना अंतराचा. यामुळे दुचाकीस्वारांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. पद्मावती चौक ते अप्पर वर्ध्यापर्यंत, तसेच शहरातील इतर भागांतही रस्त्यावर असलेल्या गतिरोधकांवरून दुचाकी उसळून पडल्याची घटना घडत आहेत. शहरात अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी गतिरोधक आवश्यक असल्याने रबलिंग पद्धतीचे गतिरोधक उभारण्यात यावेत, असा नियम आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, सूचनांना तिलांजली देण्यात आल्याने उंच गतिरोधकामुळे वाहने घसरून वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहे. गतिरोधक उभारण्यासाठी इंडियन रोड सायन्स निकषांची अंमलबजावणी आवश्यक आहे. गतिरोधक कसा उभारावा, एकाच रस्त्यावर दोन गतिरोधक उभारताना त्यात किती अंतर असले पाहिजे, त्यांची उंची किती असावी याबाबत निकष ठरवले गेले आहेत; पण गतिरोधक उभारताना आवश्यक सूचनांकडे दुर्लक्ष केले आहे.
गतिरोधकाची उंची किती हवी- गतिरोधक उभारताना गतिरोधकांची उंची अडीच ते १० सेंटिमीटर आणि लांबी ३.५ सेंटीमीटर, मीटर वर्तुळकार क्षेत्र १७ मीटर असते. - इंडियन रोड सायन्स निकषाची अंमलबजावणी केल्यास त्यामुळे वाहनचालकांना त्रास कमी होतो. मात्र, याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.
रोज किमान एक जण तरी पडतो- गतिरोधक उभारल्यावर त्यावर थर्मी प्लास्टिक पेंट, पट्ट्या काढणे आवश्यक आहे. शिवाय वाहन चालकांना सूचना मिळण्यासाठी गतिरोधक येण्याआधी ४० मीटर अंतरावर सूचनाफलक हे रस्त्यावर असणे अपेक्षित आहे.- मात्र, मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचनांना तिलांजली देण्यात आली आहे. पंचायत समिती ते अप्पर वर्धा वसाहतीपर्यंत गतिरोधकवर पांढरे पट्टे नसल्याने दररोज किमान एक तरी अपघात होतो, आता हे नित्याचेच झाले आहे.
गतिरोधक कोणत्या नियमात बसतात- गांधी चौक ते गुरुनानक धर्मशाळा या रस्त्यावर किमान १५ गतिरोधक आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या अनेकांना मान, पाठ व कमरेचा त्रास होत आहे. - पद्मावती चौक ते तिरुपती टॉकीजपर्यंत स्पीड ब्रेकरमुळे अनेक दुचाकी, चारचाकी वाहनधारकांच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोणत्या निकषाप्रमाणे हे गतिरोधक लावले हे कळायलाच मार्ग नाही.
शरीराची हाडे खिळखिळी झाली
रस्त्यावर गतिरोधक असणे आवश्यक आहे. त्यामुळे भरधाव चालणाऱ्या वाहनांना अटकाव होतो. मात्र, गतिरोधकाची उंची, अंतर याचे काही निकष आहे. त्याचा वापरच केला जात नाही. या गतिरोधकांमुळे अनेकांच्या शरीराची हाडे खिळखिळी झाली आहेत. याचाही विचार करणे गरजेचे आहे.- नारायण घोडे, वाहन चालक.
गतिरोधक हे वाहनाची स्पीड कमी करण्यासाठी आहे. मात्र, त्यापेक्षा अपघाताचे कारण बनलेले चित्र दिसत आहे. शहरात असलेल्या अनेक गतिरोधक बनविताना नियमच धाब्यावर बसविले आहेत. त्यामुळे सर्व गतिरोधक निकषाप्रमाणे नवीन करावे, अशी मागणी आहे.- सुरेश मोटवाणी, सामाजिक कार्यकर्ते.