लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ग्रामीण पत्रकारांच्या धैर्यशीलतेमुळेच पत्रकारिता जीवंत आहे. आपला अहंकार बाजूला ठेवून सामाजिक कार्यात भाग घ्यावा, समाजभाव हा महत्त्वाचा विषय आहे. सामाजिक व्यथा, अवतीभवतीच्या वेदना पत्रकारांनी लेखनीतून मांडाव्यात. माणूस मंगळावर गेला असला तरी शेजान्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. पत्रकारांनी विवेक जपण्याचं काम करावं. भाषणाचे व्याकरण चुकले तरी चालेल; मात्र, माणसाचे आचरण चुकता कामा नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार (नागपूर) श्रीपाद अपराजित यांनी केले.
वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने रविवारी स्थानिक दादाजी धूनीवाले मठ सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेत ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार (नागपूर) प्रमोद काळबांडे, वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डौं, सचिन पावडे, वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे, श्रमिक पत्रकार संघाचे सचिव डॉ. राजेंद्र मुंढे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख, नाट्य सिने दिग्दर्शक हरीश इथापे, किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, ज्येष्ठ समाजसेवक सुनील बुरांडे, वर्धा यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीपाद अपराजित पुढे म्हणाले इंटरनेटवर प्रादेशिक भाषांचे वलय आहे. दहापैकी नऊ प्रादेशिक भाषा आघाडीवर आहेत. इतके या क्षेत्रात प्रादेशिक भाषांचे महत्त्व वाढले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "बहिष्कृत भारत' नावाचे साप्ताहिक काढले होते. यात मराठीचे वर्गणीदार झाले पाहिजेत, असे म्हटले आहे. हे वर्गणीदार आधी पत्रकारांनी व्हावे. तंत्रज्ञान स्नेही व्हावे आणि व्यसनापासून दूर राहावे, यासोबत पत्रकारांनी मनापासून संवादी व्हावे असेही ते म्हणाले. समाजमाध्यमांचा मोठा धोका पोहोचत असल्याचे सांगून विना गेटकिपरचा सिनेमा म्हणजे समाजमाध्यम असल्याची टीका त्यांनी केली. पत्रकारांनी आणीव आणि सहवेदना ठेवून पत्रकारिता करण्याचे आवाहन श्रीपाद अपराजित यांनी केले.
यावेळी पत्रकार प्रशांत देशमुख यांनी 'बदलती पत्रकारिता आणि आव्हाने' या विषयावर तर डॉ. राजेंद मुंढे यांनी महात्मा गांधी, विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेले वर्धा से पत्रकारांसाठी पोषक वातावरण निर्माण करून देणारे स्थळ असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रवीण धोपटे यांनी केले. सूत्रसंचालन आनंद इंगोले यांनी केले. प्रफुल्ल व्यास यांनी आभार मानले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शोषित, पीडित यांच्या प्रश्नांवर लिखाण गरजेचे दक्षिण आफ्रिकेतील फोटो जर्नलिस्ट केविन कार्टर यांचे उदाहरण देत प्रमोद काळबांडे म्हणाले, पत्रकारिता करताना आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. वर्धा जिल्ह्यातील पारधी बेड्यांसह भटक्या विमुक्त समाज वस्त्यांत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या प्रकर्षान वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडल्याचा पत्रकारितेतील थरारक अनुभवपट त्यांनी मांडला. यावेळी त्यांनी आपण सहकायांच्या मदतीने अशा वंचित घटकांसाठी ५२ शाळा सुरू केल्याचेही नम्रपणे नमूद केले. पत्रकारांनी भटके, अनुसूचित जाती जमाती, पारधी, भाट, शोषित, पीडित यांच्या प्रश्नांवर लिखाण केले पाहिजे, आज सोशल मीडियासारखे माध्यम आपल्याजवळ असताना चाकूने गळा कापायचा की भाजी, हे आपण ठरवावे, असेही प्रमोद काळबांडे म्हणाले.