वर्धा : सेवाग्राम मार्गावरील इंदिरा गांधी उड्डाणपूल ते दत्तपूर हा मार्ग ' ग्रीन रोड ' व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहे. पण याच मार्गावरील सुमारे ६० वर्ष जुन्या वृक्षांची कुठलीही परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून सेवा देणाऱ्या एका अधिकाऱ्याने स्वत: च्या फायद्यासाठी कत्तल केली. याची माहिती जबाबदार अधिकाऱ्यांना दिल्यावर अधिकारीही मूग मिळून राहिल्याने जबाबदार अधिकाऱ्याच्या दुर्लक्षित धोरणाच्या निषेधार्थ वन्यजीव प्रेमी आशिष गोस्वामी यांनी थेट विहिरीत उडी घेत जलसमाधी आंदोलन केले. आंदोलनाची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी आंदोलन स्थळ गाठून आंदोलकर्त्यांशी चर्चा केली. ठोस आश्वासन अंती आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.
फेसबुक लाईव्ह करून प्रशासनाला केले जागे
शुक्रवारी वृक्षाच्या फांद्या तोडण्यात आल्या. त्यामुळे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दिन मे ढाई कोस असे धोरण अवलंबल्याने सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून सेवा देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याने शासकीय सुटीचा फायदा घेत ६० वर्ष जुन्या वृक्षाची थेट अवैध कत्तल केली. अवैध वृक्षतोड झाल्याचे लक्षात येताच आशिष गोस्वामी यांनी संबंधित स्थळावरून फेसबुक लाईव्ह करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. मागणीवर पुढील एक तासांत विचार न झाल्यास थेट जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला. पण अधिकारीही अवैध वृक्षतोड बाबत गंभीर नसल्याचे लक्षात येताच आशिष गोस्वामी यांनी थेट विहिरीत उडी घेतली. त्यामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.
रस्त्यासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीवर होते वृक्ष
वर्धा शहराच्या शेजारील इंदिरा गांधी उड्डाणपूल ते दत्तपूर या मार्गासाठी अधिग्रहित केलेल्या जागेवर संबंधित वृक्ष होते. अवैध कत्तल केलेल्या वृक्षापासून अवघ्या काही मीटरवर बांधकाम विभागात अभियंता म्हणून सेवा देणाऱ्या अधिकाऱ्याच्या मालकीची विहीर आहे. या वृक्षाच्या सावलीत अनेक नागरिक क्षणभर विश्रांती घेत असल्याने आणि हीच बाब संबंधित अभियंत्याला खटकत असल्याने त्यांनीच ६० वर्ष जुन्या वृक्षाची अवैध कत्तल केल्याचा आरोप आंदोलनादरम्यान आशिष गोस्वामी यांनी केला.