पवनार : सततच्या नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने स्वतःच हातपाय दोरीने बांधून त्याच्याच शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास पवनार येथे उघडकीस आली. या घटनेने गावात खळबळ उडाली.
प्रवीण रामेश्वर बोरकर (४२) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी दिवसभर शेतातील हरभरा काढून प्रवीण घरी गेला. जेवण करून शेतात हरभऱ्याची राखण करायला जातो, असे सांगून पुन्हा निघाला. प्रवीण सकाळी घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्याचा शोध घेतला असता, त्याने आत्महत्या केल्याचे समजले. काही वर्षांपूर्वी प्रवीणच्या भावाने देखील आत्महत्या केली होती.
प्रवीणला पोहणे येत असल्याने त्याने स्वतःच हातपाय दोरीने बांधले व स्वतः ला विहिरीत लोटून घेतले. सततच्या नापिकीमुळे तो नेहमी विचारात राहायचा. त्याला डोकेदुखीचा आजारही जडला होता, अशी माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली. सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. प्रवीणच्या आत्महत्येने गावात शोककळा पसरली असून पुन्हा एका शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली.
दुसऱ्या प्रयत्नात गेला 'प्रवीण'चा जीव.....
मृतक प्रवीण बोरकर हा नेहमी चिंतित राहायचा. त्याने यापूर्वी देखील शेतात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, दुसच्या प्रयत्नात त्याचा जीव गेल्याने गावात शोककळा पसरली आहे.