वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधीविषयी(Mahatma Gandhi) वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजावर(Kalicharan Maharaj) वर्धा शहर पोलिसात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालीचरण हे छत्तीसगढ राज्यातील रायपूरच्या सेंट्रल जेलमध्ये या प्रकरणी अटकेत होते. यानंतर त्यांना वर्धा शहर पोलिसांनी काल संध्याकाळी पाच वाजता ताब्यात घेत वर्धेला आणले.
रात्री तीन वाजता दरम्यान कालिचरण यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. सध्या त्यांची सेवाग्राम पोलीस ठाण्यात विचारपूस सुरु असून सकाळी साडे अकरा वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे. वर्धा जिल्हा हा महात्मा गांधीजीची कर्मभूमी राहिला आहे. कालीचरण महाराज विरोधात सर्वात पहिली तक्रार वर्ध्यात झाल्याने गुन्हा दाखल सुद्धा वर्धा जिल्ह्यात करण्यात आला होता.
२६ डिसेंबरला रायपूरच्या धर्मपरिषदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानतंर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असताना पहिली तक्रार महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी २८ डिसेंबरला शहर पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करत आज त्यांना न्यायालयात आणण्यात येणार आहे.