भर उन्हातही शेतकरी व्यस्त : ट्रॅक्टरच्या वापराकडे कलघोराड : खरीप हंगाम संपताच, रब्बीची तयारी, अन् रब्बी हंगाम होताच खरीप हंगामाची पूर्व तयारी असे बळीराजचे चक्र अविरत सुरू आहे. त्याच्या या चक्रानुसार उन्हाच चटके जाणवताच त्याने खरीपाची तयारी सुरू केल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. या कामात तो रखरखत्या उन्हातही व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. वर्ष कसही निघो, बळीराजाकडे शेतीची मशागत करणे, बीज रोवणे, त्याचे संगोपण करणे ही कामे आलीच. यातच अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करून हातात आलेल्या पिकावर समाधान मानने असा अलिखित नियमच त्याच्याकरिता तयार झाला आहे. उन्ह, पाऊस असो की हिवाळ्याची थंडी, शेताच्या बांधावर सूर्याेदय अन सूर्यास्त पाहणे त्याच्या रोजचे कर्तव्यच. चंद्राच्या उजेडात रात्रीची जागल करून वन्य प्राण्याच्या तावडीतून पिकाची जोपासना करावी लागते, अशी अवस्था बळीराजाची आहे. खरीपातील कपाशीची उलंगवाडी सुरू असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने ती काढल्या जात आहेत. या पऱ्हाट्या शेतकरी व शेतमजूर सरपणासाठी गोळा करतात. तर गव्हाची मळणी झाली असून चणाही निघाला आहे. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूंगाची पेरणी केल्याने काही भागात हिरवेकंच शेत दिसत आहे. मे महिन्याच्या शेवटास भुईमूगाच्या मळणीचा हंगाम सुरू होईल. चारा टंचाईमुळे व बैलजोड्यांच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक शेतकऱ्यांजवळ बैलजोडी राहिलीच नाही. त्यामुळे मशागतीचे कामे ट्रॅक्टरच्या सहायाने केली जात आहेत.(वार्ताहर) सध्याच्या भावबाजीवर ठरते नवे नियोजनशेतकरी पुढील हंगामाचे नियोजन सध्या मिळत असलेल्या शेतमालाच्या दरावर ठरवत असतो. गत वर्षी तुरीला ८ हजार रुपये भाव मिळाल्याने खरीपात तुरीचा पेरा वाढला होता. यंदा मात्र तुरीचा भाव ४ ते ४५०० पर्यंत आहे तर शासकीय खरेदीत अनेक अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे नव्या हंगामात तुरीचा पेरा घटण्याचे संकेत मिळत आहेत. या तुलनेत कपाशीचा पेरा वाढणार असल्याचे संकेत असून मुंग व उडीदाच्या पेऱ्याचे नियोजन शेतकरी करताना दिसून येत आहेत. शेतकरी बारमाही व्यस्तचसकाळपासून सायंकाळपर्यंत राबराब कष्ट करणारा शेतकरी शेताच्या कामात बारमाही व्यस्तच असतो. उन्हाळ्याच्या दिवसात शेताची नागरणी याला उन्हाळवाही म्हटल्या जाते. यानंतर जांभुळवाही, पाऊस येताच शेताला कुंपणासाठी काट्याच्या फासाची व्यवस्था, शेणखतासाठी भटकंती, नंतर सारे फाडण्याची गडबड, पेरणीची धडपड, पिकाची उगवण होताच डवरणीची घाई, पिकाची वाढ होताच निंदणाची लगबग, तर पिकावरील नुकसान होऊ नये म्हणून रात्रीची शेतात जागल त्यामुळे शेतकरी कामात व्यस्तच असतो.
कपाशीची उलंगवाडी; खरिपाची तयारी
By admin | Published: April 07, 2017 2:02 AM