स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतर विकास : गाव झाले आष्टी नगर पंचायतचा प्रभागलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे पूर्ण झाली. बदलत्या काळाच्या प्रवाहात गावेही विकासाच्या वाटा चोखांदळत आहेत. आष्टी तालुक्यातील अवघ्या २५ कुटुंबांचे सिंदीविहिरा हे गावही १०० टक्के विकसित झाले आहे. शासनाच्या विविध विभागांनी निधी देत या गावाला सर्व सुविधायुक्त केल्याचे दिसून येत आहे. धोंगडी यांची शेकडो एकर शेती, मोठा वाडा याच गावात आहे. आष्टीपासून अवघ्या दोन किमी अंतरावर हे गाव वसले आहे. या रस्त्यासाठी म्हाळा- मिनी म्हाळा योजनेतून तत्कालीन उपविभागीय अभियंता विवेक पेंढे यांनी ३० लाख रुपये मंजूर करून आणले होते. यात दीड किमी रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. उर्वरित ७०० मीटरकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून २० लाख रुपये प्राप्त झाले होते. रस्त्याचा पूर्ण प्रश्न निकाली निघाला आहे. गावातील अंतर्गत सिमेंट रस्ते व नाल्याच्या बांधकामाकरिता माजी आमदार दादाराव केचे यांनी १० लाख रुपयांचा निधी दिला होता. शाळा नसल्याने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पायपीट होत होती. यासाठी माजी पं.स. उपसभापती विनायक धोंगडी यांनी सर्व शिक्षा अभियानमधून ५ लाख रुपये मंजूर करून घेतले. यातून शाळा, अंगणवाडी, किचन, संरक्षण कुंपण तयार करण्यात आले आहे. या गावात आष्टीचे मोहन चव्हाण यांची शेती आहे. त्यांनी अत्याधुनिक गोठा तयार केला आहे. यात गावरानी कोंबड्यांची पैदास होते. २०० च्या जवळपास मोठे कोंबडे तयार झाले आहे. शिवाय हल्यांच्या टक्करीकरिता (झुंंज) सिंदीविहिरा गाव प्रसिद्ध आहे. शासनाची बंदी असल्यामुळे येथील झुंज बंद होती. आता शंकरपट प्रमाणेच हल्यांची झुंजही सुरू होणार आहे. ही झुंज पाहण्यासाठी गावात हजारो लोक येत होते. आता ही झुंज पुन्हा सुरू होणार असल्याने गावातील रेलचेल वाढणार आहे. गाव निसर्गाच्या सौंदर्यात टेकडीच्या पायथ्याची वसले आहे. वनविभागाचे घनदाट जंगल लागून आहे. गावातील बहुतांश नागरिक स्वावलंबी झाले आहेत. शासनाच्या विकासकामांमुळे हे गाव परिपूर्ण झाले आहे. सिंदीविहिराचा भाग आता आष्टी नगर पंचायतमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे या परिसराचा घरकूलसारख्या योजनांच्या माध्यमातून विकास होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विद्यार्थ्यांची पायपीट थांबलीआष्टी शहरापासून अवघ्या दोन किमी अंतरावर असले तरी सिंदीविहिरा गावात शिक्षणाचे कुठलेही माध्यम नव्हते. परिणामी, येथील विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत होती. अनेकांच्या सहकार्यातून आता सिंदीविहिरा गावानेही कात टाकली आहे. या गावात प्राथमिक शाळा, अंगणवाडीची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे येथील चिमुकल्यांना आता गावातच शिक्षण मिळू लागले आहे. सुशोभित शाळेसह कुंपण भिंतही करण्यात आली आहे. यासाठी सर्व शिक्षा अभियानातून निधी प्राप्त झाला असून गावाचा कायापालट झाल्याचेही दिसून येत आहे. गाव झाले स्वावलंबीशासनाच्या विकास कामांमुळे हे गाव स्वावलंबी झाले आहे. काही वर्षांपर्यंत बंद असलेली हेल्यांची झुंज गावात सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांची गदी होणार असून रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे. शिवाय अन्य व्यवसायही गावात सुरू होत असल्याने रोजगार उपलब्ध होणार आहेत.
सिंदीविहिरा गावाने टाकली कात
By admin | Published: June 27, 2017 1:16 AM