कांरजा (घा़) : जिल्ह्यात सेलू व समुद्रपूर पाठोपाठ कारंजा (घाडगे) व आष्टी (शहीद) ग्रामपंचायतीचेही नगरपंचायतीत रूपांतर झाल्याचे सोमवारी जाहीर झाले. तसे आदेश मंगळवारी दोनही पंचायत समितीत धडकले. यामुळे येथील पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.येथील ग्रामपंचायतीत नव्या सरपंचांनी पदभार स्वीकारला; परंतु शासनाने तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे ठरविले. यात ३० मार्च २०१५ रोजी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगीकनगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार राज्य शासनाने तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्याबाबत निर्णय घेतला. त्यानुसार दिनांक ३० मार्च २०१५ रोजी नगर विकास विभाग यांची अधिसूचना निर्गमित झाली व कारंजा आणि आष्टी या तालुक्यांच्या ठिकाणच्या ग्रामपंचायती नगरपंचायत म्हणून जाहीर करण्यात आल्या. कारंजा या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र आणि तालुका मुख्यालय असल्यामुळे ते संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करून कारंजा नगरपंचायत घोषित झाली. त्याचप्रमाणे शेकापूर (रिठ) व कारंजा ग्रामपंचायतीचे संपूर्ण क्षेत्र नगरपंचायतीत समाविष्ट झाल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार कारंजा पंचायत समिती सदस्य पदसुध्दा रिक्त झाले आहे. या दोनही नगरपंचायतीवर तहसीलदार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती होणार असल्याचे आदेशात नमूद आहे.(शहर प्रतिनिधी)
कारंजा व आष्टीही नगरपंचायत घोषित; प्रशासकाची नेमणूक
By admin | Published: April 02, 2015 1:57 AM