लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि महिलांसाठी आदरणीय कस्तुरबा गांधी यांची १५० वी जयंती ११ एप्रिल रोजी साजरी होत आहे. यानिमित्त पुणे येथे रॅली, मान्यवरांचे व्याख्यान व ग्रंथाचे प्रकाशन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात देशभरातून सर्वोदयी व गांधी विचारसरणीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष व समन्वयक जयवंत मठकर यांनी दिली.कस्तुरबा गांधी यांच्या जयंती दिनी सकाळी ८.३० वाजता आगाखान पॅलेस येथील समाधी स्थळ, महात्मा गांधी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गंज पेठ, फुले वाडा मार्गे वाहन रॅली निघणार आहे. एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन सभागृहात माजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेत सभा होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार, जयवंत मठकर, आदित्य पटनायक, ‘मिळून साऱ्याजणी’च्या विद्या बाळ, फांऊडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉ. जी.जी. पारेख यासह गांधी व कस्तुरबांचा सत्याग्रह व जीवनशैली यावर सुनिती, कस्तुरबा रचनात्मक कार्य यावर शोभा सुपेकर, कस्तुरबा आणि स्त्री-शक्ती वर डॉ. रझिया पटेल सभेला संबोधित करतील. प्रास्ताविक विद्या बाळ, नीता परदेशी, अॅड. मधुगीता सुखात्मे करतील. न्या. धर्माधिकारी यांच्या लेखांचे संकलन वर्ध्याच्या गांधी विचार परिषदचे अध्यापक डॉ. रामचंद्र प्रधान यांनी ‘व्युमेन पावर, अ गांधीयन डिसकरेज’ या इंग्रजी भाषांतरीत ग्रंथाचे प्रकाशन याप्रसंगी होणार आहे.कार्यक्रम दोन सत्रात चालणार असून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींनी उपस्थित राहावे, असे आहावान महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवचरण ठाकूर, पुणे जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष अॅड. संतोष म्हस्के, विश्वस्त बी.आर. लबडे, संयोजक चंद्रकांत निवंगुणे यांनी केले आहे.
कस्तुरबा गांधी यांची १५० वी जयंती बुधवारी होणार साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 11:22 AM
स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि महिलांसाठी आदरणीय कस्तुरबा गांधी यांची १५० वी जयंती ११ एप्रिल रोजी साजरी होत आहे. यानिमित्त पुणे येथे रॅली, मान्यवरांचे व्याख्यान व ग्रंथाचे प्रकाशन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देदेशभरातील सर्वोदयी व गांधीवादी होणार सहभागी