लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कस्तुरबा ही महात्मा गांधींची अशिक्षित सहचारिणी नव्हे तर ती एक सत्याग्रही वीरांगना होती, हे इतिहासाला कधी कळलेच नाही. महात्म्याच्या तेजस्वी प्रतिमेआड कस्तुरबाचे योगदान झाकोळल्या गेले. वयाने बापूंपेक्षा मोठ्या असलेल्या कस्तुरबाने सहजीवनाच्या आरंभकाळात दिलेल्या निरपेक्ष सहकाराची दखलही कधी घेतल्या गेली नाही. कस्तुरबा नसती तर कदाचित मोहनदास महात्मा झाले नसते, असे भावूक उद्गार महात्मा गांधी यांचे पणतू आणि 'लेट्स किल गांधी' या बहुचर्चित ग्रंथाचे लेखक तुषार गांधी यांनी ‘गांधी समजून घेताना’ मासिक व्याख्यानमालेत काढले.स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात गांधी फॉर फ्युचर समितीद्वारे तुषार गांधी यांनी ‘बा कस्तुरबा’ या विषयावर व्याख्यानमालेचे आठवे पुष्प गुंफले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबतच कस्तुरबा गांधी यांचेही हे १५० वे जयंतीवर्ष आहे, याची जाणीव ठेवत समितीद्वारे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कस्तुरबाच्या योगदानाबद्दल सांगताना तुषार गांधी म्हणाले, वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षी मोहनदास आणि कस्तुरबाचा विवाह झाला असला तरी ती त्याही आधीपासून अंधाराला घाबरणाऱ्या मोहनला ओळखत होती. पूर्वायुष्यातील भित्रा बालक, घरात चोरी करणारा मुलगा, व्यापारात अयशस्वी असलेला तरुण, आततायी पती इथपासून तर आपल्या चुकांची वडिलांकडे स्पष्ट कबुली देणारा पुत्र आणि सत्यासाठी सत्तेशी लढणारा सत्याग्रही, अशा या महात्म्याच्या वाटचालीतील प्रत्येक क्षणाची कस्तुरबा साक्षीदार होती. मोहनच्या लंडन प्रवासासाठी स्त्रीधन असलेले दागिने विकणारी, परदेश प्रवासासाठी जातीबहिष्कृत झालेल्या मोहनच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी कस्तुरबाच होती.मोहनमध्ये सत्याग्रही होण्याचे धाडस निर्माण करणारी ही कस्तुरबा आहे. बॅरिस्टर गांधींसोबतच कस्तुरबाचाही लढा दक्षिण आफ्रिकेपासून कळत नकळत सुरु झाला होता. आणि त्याहीनंतर बापूंच्या प्रत्येक लढ्यात सत्याग्रही बनून ती सोबत राहिली आहे.चंपारण्याच्या लढ्याची नायिका कस्तुरबा आहे. अंगावर वस्त्र नाहीत म्हणून घराबाहेर न पडणाºया स्त्रियांची मानसिकता बदलविणारी, त्यांच्या गावात शाळा सुरु करणारी, स्वदेशीचा आग्रह धरणारी कस्तुरबा इतिहासात अजूनही बेदखल आहे. स्वत: उभ्या केलेल्या वास्तूंची इंग्रजांनी वारंवार राखरांगोळी केली असता पुन्हा नव्या जोमाने उभारणी करणारी ही कस्तुरबा आहे. आरंभकाळात दांडीयात्रेत सहभागी असलेल्या कस्तुरबाचा उल्लेख महत्प्रयासाने सापडतो. माझा नवरा इंग्रजांचे अत्याचार झेलू शकतो तर मी कशी मागे राहू, असे म्हणत बापू कारावासात असताना मुंबईतल्या शिवाजी पार्कवर ब्रिटिशांविरुद्ध जाहीर भाषण देणारी ही कस्तुरबा आहे. कस्तुरबाला इंग्रज अटक करतात ते गांधींची पत्नी म्हणून नव्हे, तर सत्याग्रही म्हणून, याचाही इतिहासाला विसर पडला आहे. याच कारावासात कस्तुरबा आजारी पडते आणि पुढे आगाखान महालात नजरकैदेत तिचा मृत्यू होतो. स्वातंत्र्य लढ्यातील पहिली शहीद सत्याग्रही, असा तिच्या हौतात्म्याचा उल्लेख नेताजी सुभाषचंद्र बोस परदेशातून पत्र पाठवून करतात. म्हणूनच गांधी समजून घेताना ही कस्तुरबाही पुन्हा नव्याने समजून घेण्याची गरज आहे, असे तुषार गांधी म्हणाले. प्रारंभी स्वागताध्यक्ष प्रकाश कथले यांच्या हस्ते चरखा व खादीवस्त्र देऊन तुषार गांधी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मीडिया वॉचच्या 'गांधी १५०' विशेषांकाचे प्रकाशन तुषार गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.‘मैं कस्तुरबा का भी परपोता हू’ पण, मीही त्यांचा गुन्हेगार आहे‘मै कस्तुरबा का भी परपोता हूं’ असे सांगत केवळ इतिहासानेच नव्हे तर आप्तस्वकियांनीही कस्तुरबांच्या कर्तृत्वाची आणि त्यागाची कधी दाखल घेतली नाही, अशी खंत तुषार गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. महात्म्याच्या देदीप्यमान वाटचालीचा मागोवा घेत असताना कस्तुरबाच्या योगदानाकडे आपलेही दुर्लक्षच झाल्यामुळे आपणही गुन्हेगार आहोत, असे सांगताना गहिवरलेल्या तुषार गांधी यांच्यासोबत सभागृहही भावविवश झाले होते.
कस्तुरबांचे योगदान झाकोळल्या गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 9:50 PM
कस्तुरबा ही महात्मा गांधींची अशिक्षित सहचारिणी नव्हे तर ती एक सत्याग्रही वीरांगना होती, हे इतिहासाला कधी कळलेच नाही. महात्म्याच्या तेजस्वी प्रतिमेआड कस्तुरबाचे योगदान झाकोळल्या गेले. वयाने बापूंपेक्षा मोठ्या असलेल्या कस्तुरबाने सहजीवनाच्या आरंभकाळात दिलेल्या निरपेक्ष सहकाराची दखलही कधी घेतल्या गेली नाही. कस्तुरबा नसती तर कदाचित मोहनदास महात्मा झाले नसते, असे भावूक उद्गार महात्मा गांधी यांचे पणतू आणि 'लेट्स किल गांधी' या बहुचर्चित ग्रंथाचे लेखक तुषार गांधी यांनी ‘गांधी समजून घेताना’ मासिक व्याख्यानमालेत काढले.
ठळक मुद्देतुषार गांधी यांची खंत : ‘गांधी समजून घेताना’ मासिक व्याख्यानमाला