वर्धा : नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील नबिरा महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या व्यक्तीने नागपूर-अमरावती महामार्गावरील वर्धा नदीपात्रात उडी घेतली. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास खडका नजीक घडल्याने एकच खळबळ उडाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
विनोद केशव बागवाले (५२) रा. यवतमाळ, असे नदी पात्रात उडी घेणाºया प्राध्यापकाचे नाव आहे. ते नबिरा महाविद्यालयात कार्यरत असून गुरुवारी सकाळी ते एम.एम. ४० ए.आर.३०५२ क्रमांकाच्या कारने नागपूर-अमरावती महामार्गावरील खंडका नजीकच्या वर्धा नदीपात्राजवळ आले. त्यांनी महामार्गाच्या बाजुला कार उभी करुन नदीत उडी घेतली.
हा प्रकार काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याची माहिती तळेगाव (श्याम.पंत) येथील पोलिसांना देताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रात लांबपर्यंत शोध घेतला,पण त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. एसडीआरएफच्या चमुलाही पाचारण करण्यात आले. त्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य चालविले. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी हरविल्याची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु आहे.