वर्धा : देवळी पंचायत समिती अंतर्गत कवठा(रे.) ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार होत आहे. याची चौकशी करुन संबंधितावर योग्य कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच नागोराव महल्ले यांनी निवेदनातून केली आहे. याबाबतची तक्रार व निवेदन देवळी पंचायत समिती कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय कवठा येथे देण्यात आले. तसेच नागोराव महल्ले यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले. मात्र रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने रस्त्याला भेगा पडल्या आहे. यातही आर्थिक अपहार केल्या असल्याची शंका नाकारता येत नाही. याची चौकशी करणे आवश्यक आहे. गावात क्रीडांगण उभारण्यासाठी पायका अंतर्गत एक लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र संबंधित कामाचे कंत्राट संबंधातील व्यक्तीस देवून यातही आर्थिक अपहार केला. क्रीडांगणावर विटाचे तुकडे टाकले. याची निविदा जाहीररीत्या प्रकाशित न करता परस्पर व्यवहार केला. आता वर्षभराचा कालावधी उलटूनही क्रींडागणाचे काम अपूर्ण आहे. ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामातही हाच प्रकार आहे. यासह दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत ग्रामपंचायतला चार लाख रुपयांचा निधी परस्पर खर्च केला. सौरदिवे खरेदीही आर्थिक गैरव्यवहार केला. याची चौकशी करण्याची मागणी महल्ले यांनी करताच त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव पारित केला. हा प्रकार हेतुपुरस्सर होत असल्याने याची चौकशी करुन न्याय देण्याची मागणी आहे. तसेच ग्रा.पं. सदस्यांना बैठकीचा नोटीस वेळेवर दिला जात नाही. ग्रामसेवक आणि ठराविक सदस्य परस्पर सभा घेवून मोकळे होतात. याची चौकशी करून संपूर्ण आर्थिक व्यवहाराचे पत्रक मागितले जावे, अशी मागणी केली.(स्थानिक प्रतिनिधी)
कवठा ग्रामपंचायतीत सावळागोंधळ
By admin | Published: October 04, 2014 11:31 PM