महेश सायखेडे
वर्धा : हिवतापाच्या डासाची उत्पत्ती साचलेल्या पाण्यात होते. इतकेच नव्हे तर ॲनाफेंलिस डासाची मादीच्या दंशातून लाळेद्वारे जंतू संसर्ग होतो. शिवाय हिवतापाचे जंतू मानवाच्या शरिरात सोडले गेल्यावर या जंतूची वाढ दहा ते बारा दिवसांपर्यंत होऊन मनुष्याला हिवतापाची लागण होते. वेळीच उपचार न मिळाल्यास हिवतापामुळे मनुष्याचा मृत्यूही होऊ शकत असल्याने हिवताप विषयी प्रभावी जनजागृती करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकार डॉ. रा.ज. पराडकर यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. जयश्री थोटे यांच्या नेतृत्त्वात सोमवारी जिल्ह्यातील तब्बल १५ ठिकाणी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात मोठ्या संख्येने तरुणींनी सहभागी होत एकापेक्षा एक आकर्षक रांगोळी रेखाटून 'स्वच्छता पाळा-हिवताप टाळा'चा संदेश दिला.
हिवतापाची लक्षणे अनियमित ताप येणे, थंडी वाजून ताप येणे, डोके दुखणे, मळमळ होणे ही हिवतापाची प्राथमिक लक्षणे आहेत.
नागरिकांनी काय करावे?
घराचा परिसर नेहमीच स्वच्छ ठेवावा. घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये. साचलेली गटारी वाहती करावी. छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकन बसवावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. घरात मच्छरदाणीचा वापर करावा. डासोत्पत्ती स्थानांचा सोध घेत यामध्ये गप्पी मासे टाकावे. शौचालयाच्या व्हेट पाईपला जाळी बसवावी. हिवतापाची लक्षणे असलेल्या व्यक्तीने कुठलाही घरगुती उपाय न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.या ठिकाणी राबविण्यात रांगोळीतून जनजागृती उपक्रम
झडशी प्राथमिक आरोग्य केंदाअंतर्गत येणाऱ्या येळाकेळी, नंदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नंदोरी, जाम, निंबा, परडा, नारायणपूर, उबदा, साहूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या साहुर, वडाळा, माणिकवाडा, बोरगाव, तारासावंगा, दहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या दहेगाव, सिंदी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सिंदी रेल्वे तर वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रांगोळीतून प्रभावी जनजागृती हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला हे विशेष.