वर्धा : सार्वत्रिक वितरण प्रणाली अंतर्गत गोरगरीब, सामान्य नागरिकांना स्वस्त धान्य, रॉकेलचे वितरण केले जाते़ यासाठी वितरक नेमण्यात आले आहेत; पण सध्या केंद्र व राज्य शासनाद्वारे या वितरण व्यवस्थेत काही फेरबदल करण्यात आले आहेत़ या बदलांमुळे एपीएलधारकांचे धान्य बंद झाले तर रॉकेलच्या कोट्यात कपात झाल्याने वितरकांसह गोरगरिबांनाही केरोसिनसाठी ताटकळावे लागते़ शहरातील इंदिरा मार्केट परिसरात डबक्या रांगेत लावून किरकोळ वितरकाची प्रतीक्षा करीत असलेल्या महिलाही याचीच प्रचिती देताहेत़केंद्र व राज्य शासनाच्यावतीने गोरगरीब नागरिकांना स्वस्त धान्य, खाद्य तेल, रॉकेल पुरविले जाते़ यासाठी वितरण व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे़ स्वस्त धान्य दुकानदारांद्वारे नागरिकांना धान्य, खाद्य तेल, साखर पुरविली जाते तर रॉकेल वितरकांद्वारे रॉकेलचे वितरण केले जाते़ यात ठोक व किरकोळ रॉकेल वितरक नेमण्यात आलेले आहेत़ ठोक वितरकांकडून किरकोळ वितरक रॉकेल घेऊन शिधापत्रिका धारकांना पुरवितात़ यासाठी हे विक्रेते रॉकेलच्या गाड्या घेऊन प्रत्येक वॉर्डात वा ठरविलेल्या स्थळी पोहोचतात़ शासनाद्वारे रॉकेलचा कोटा सुमारे २० टक्के कमी करण्यात आला आहे़ यामुळे शेवटच्या ग्राहकापर्यंत रॉकेल पोहोचत नसल्याचे दिसून येते़ शासनाने रॉकेलच्या कोट्यात कपात केल्यामुळे वितरकांकडूनही ओरड होत होती़ याबाबत निवेदनेही देण्यात आली; पण रॉकेलचा कोटा पुर्ववत करण्यात आला नाही़ यामुळे ठोक व किरकोळ वितरकांना शिधापत्रिका धारकांना रॉकेलचे वितरण करतानाही अडचणींचा सामना करावा लागत आहे़ यामुळेच गरजू ग्राहकांना वेळेवर रॉकेल उपलब्ध होत नाही़ पूर्वी नियमित वितरित होणारे रॉकेल सध्या बहुतांश ठिकाणाहून हद्दपार झाल्याचेच दिसून येत आहे़ सध्या गॅस सिलिंडरचे ग्राहक वाढलेले आहेत़ यामुळे रॉकेलची तेवढी गरज राहिली नसल्याचे गृहित धरून शासनाकडून हा कोटा कमी करण्यात आला आहे; पण यात गरजू गोरगरीब नागरिकांचे मोठेच नुकसान होत आहे़ सिमेंटच्या जंगलामुळे शहरात सरपणही मिळत नाही आणि रॉकेलही मिळत नसल्याने स्वयंपाक कसा करावा, असा प्रश्न मोलमजूरी करून जीवन जगणाऱ्या कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)गरजू गोरगरीब शिधापत्रिका धारकांची तारांबळसार्वत्रिक वितरण प्रणाली अंतर्गत गरजू, गोरगरीब शिधापत्रिका धारकांना रॉकेल व स्वस्त धान्याचे वितरण करण्यात येते़ यातील रॉकेलचा कोटा कमी करण्यात आला आहे़ यामुळे गरजुंवर रॉकेलपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे़ गरजू, गरीब कुटुंबांना स्वयंपाकासह घरात प्रकाश करण्याकरिताही रॉकेलचाच आधार होता; पण आता तेच मिळत नसल्याने अशा कुटुंबांची तारांबळ उडताना दिसते़ यामुळेच ठराविक तारखांना रॉकेलच्या बंडीची प्रतीक्षा करीत महिलांना ताटकळावे लागते़ एपीएल शिधापत्रिका धारक नागरिकांचीही सध्या स्वस्त धान्यासाठी अशीच तारांबळ उडत आहे़ नोव्हेंबर महिन्यांपासून शासनाने सदर ग्राहकांचा धान्य कोटाच दिलेला नाही़ यामुळे तेही धान्यापासून वंचित आहेत़
केरोसीनसाठी गृहिणींची ताटकळ
By admin | Published: April 20, 2015 1:43 AM