कारंजा (घा़) : तालुक्यातील खरसखांडा या गावात फेब्रुवारी व मार्च दरम्यान वादळी पावसासह गारपीट झाले़ शेतातील सोयाबिन, संत्रा, गहू, चणा, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले; पण येथील एकाही शेतकऱ्याचे नुकसानग्रस्तांच्या यादीत नाव नाही़ यामुळे शेतकऱ्यांना शासकीय नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागले़ या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़गारपीटग्रस्तांची यादी तयार करताना दुजाभाव करण्यात आला़ यामुळे पुन्हा चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खरसखांडा येथील शेतकरी करीत आहे़ अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही सरपंच विकास नासरे व ग्रामस्थांनी तहसीलदार बालपांडे यांना सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे़ अतिवृष्टीमुळे झालेल्या सोयाबिन पिकाच्या नुकसानाचे सर्वेक्षण झाले; पण तहसील कार्यालयामार्फत अद्याप नुकसान भरपाई देण्यात आली नाही़ शासनाने लाखो रुपये वाटले; पण खरसखांड्याच्या एकाही शेतकऱ्याच्या खात्यांत अद्याप एक रुपयाही जमा झाला नाही. गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण तालुका कृषी कार्यालयाद्वारे करून अहवाल द्यायचा होता. कृषी सेवक मख यांनी पाहणी करून अहवाल संबंधित तलाठ्याकडे दिला; पण तलाठ्याने दिलेला अहवाल गायब झाल्याची माहिती आहे. निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले व शेतकरी मदतीपासून वंचित राहिला़मागील वर्षी नापिकी झाली़ उत्पादन कमी झाले. शेतमालाला भाव मिळाला नाही़ यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आहे़ नुकसान भरपाईच्या रकमेतून बी-बियाणे घेऊ, अशी आशा होती; पण तहसील कार्यालय व कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले़ यामुळे आता पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे़ प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)
गारपीटग्रस्तांच्या यादीतून खरसखांडाचे शेतकरी बेपत्ता
By admin | Published: June 28, 2014 11:44 PM