लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला वर्षभरापूर्वी किडनॅप करून पळवून नेलेल्या आरोपीस पुणे येथून बेड्या ठोकल्या. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून करण्यात आली. रोहित शिवदास कांबळे (२३, रा. सिंदी मेघे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
१६ वर्षीय मुलगी तिच्या आई- वडिलांसह घरी होती. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास मुलगी घरी दिसून आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नव्हती. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी रामनगर पोलिसांत तक्रार दिली होती. तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. रामनगर पोलिसंनी केलेल्या तपासादरम्यान आरोपीने पीडितेशी प्रेमसंबंध निर्माण करून जवळीक साधून अपहरण केल्याचे समजले.
घटनेपासून आरोपी पीडितेला घेऊन फरारी होता. अखेर हा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी व पीडितेचा सातत्याने शोध घेतला असता दोघेही चाकण, पुणे परिसरात किरायाच्या खोलीत राहत असल्याचे समजले.
अखेर ३० सप्टेंबर २०२४ रोजी शोधपथकाने पुणे शहर हद्दीतील चाकण परिसरात छापा मारला असता दोघेही किरायाच्या खोलीत राहत असल्याचे दिसले. पोलिसांनी आरोपीस अटक करून मुलीला ताब्यात घेत पुढील तपासासाठी रामनगर पोलिसांकडे हस्तांतरित केले.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक माधुरी वाघाडे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांच्या मार्गदर्शनात निरंजन वरभे, नितीन मेश्राम, नवनाथ मुंडे, अर्चना फुटाणे, दिनेश बोथकर, गोविंद मुंडे यांनी केली आहे. पुढील तपास रामनगर पोलिस करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुलीचे केले शोषण अल्पवयीन मुलीला पळवून नेल्यानंतर तिचे वर्षभरापासून लैंगिक शोषण केल्याचे पोलिस तपासादरम्यान आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी आरोपी रोहित कांबळेविरुद्ध भादंवि चे कलम ३७६ (२) (एन) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमचे कलम ४,६ अन्वये गुन्ह्यात कलम वाढ करून पुढील तपासकामी पोक्सो सेल वर्धाकडे गुन्हा हस्तांतरित केला.