शेतकरी, मजूर दहशतीत : गोहदा शिवारात १५ दिवसांतील दुसरी घटना बोरधरण : बोर व्याघ्र प्रकल्पालगत येणाऱ्या गोहदा शिवारात गोठ्यात बांधून असलेल्या कालवडावर बिबट्याने हल्ला चढवून ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. गत १५ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे गोहदा शिवारात शेतकरी व मजूर बिबट्याच्या दहशतीत आहे. बोरी येथील प्रशांत ठाकरे यांचे शेत गोहदा शिवारात आहे. येथे सायंकाळी जनावराचे चारापाणी करून गोठ्यात जनावरे बांधून ते घराकडे आले. रविवारी मध्यरात्री बिबट्याने गोठयातील गुरांवर हल्ला चढविला. यात होस्टण जातीची कालवड ठार केली तर उर्वरित जनावरे दावणी तोडून पळून गेली. संपूर्ण जनावरे भयभित झाली आहे. यापूर्वी गोहदा शिवारात अतुल गुरनूले यांच्या शेतातील गोठ्यातील कालवड ठार केली होती. ही घटना १७ जानेवारी रोजी रात्री घडली होती. दोन्ही घटनांनी मजुरांसह शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या नित्याच्या हल्ल्यामुळे मजूर शेतात काम करण्यास धजावत नाही. यामुळे शेतीची कामे ठप्प आहे. बोर व्याघ्र प्रकल्पालगतची संपूर्ण शेती ओलिताची असल्याने पऱ्हाटी, गहू, चना आदी पिके आहेत. दिवसभर वीज पुरवठा राहत नाही. रात्री वीज मिळत असल्याने शेतकरी जीव मुठीत घेऊन रात्री ओलीत जातात. अनूचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ठाकरे यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. क्षेत्र सहायक गणेश कावळे यांनी पंचनामा केला. होस्टण जातीचे कालवड ठार झाल्याने शेतकऱ्याचे सुमारे ३० हजारांचे नुकसान झाले. गोहदा, सालई पेवट, बोरी येथील शेतकऱ्यांत बिबट्याची धास्ती पसरली आहे.(वार्ताहर)
बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार
By admin | Published: February 02, 2017 12:43 AM