आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोरोनाबाधितांना विलगीकरणात ठेवण्याकरिता प्रशासनाकडून कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. या सेंटरमुळे बहुतांश कोरोनाबाधितांना मोठा आधार मिळाला. आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असून, कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या नगण्यच होती. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने सर्व कोविड केअर सेंटर बंद केले.कोरोनाबाधितापासून घरातील किंवा परिसरातील व्यक्तींना संसर्ग होऊ नये त्यामुळे रुग्णाला गृहविलगीकरणात ठेवले जात होते. परंतु, ज्या रुग्णाच्या घरी राहण्याची वेगळी व्यवस्था नाहीत, अशा रुग्णांकरिता जिल्ह्यात १९ कोविड केअर सेंटरची उभारणी केली होती. याकरिता जिल्हा प्रशासनाने समाजकल्याण, आदिवासी विकास विभाग आणि इतर आस्थापना किंवा खासगी संस्थांच्या इमारती अधिग्रहित केल्या होत्या. आता कोरोनाची लाट ओसरल्याने रुग्णसंख्याही कमी झाली आहे. परिणामी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होणाऱ्यांचीही संख्या नगण्य होती. आता कोरोनाबाधित सौम्य व अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्यांना त्यांच्याकडील उपलब्धतेनुसार गृहविलगीकरणात ठेवले जात आहे. कोविड केअर सेंटरमध्ये ५० टक्के क्षमतेपेक्षा कमी रुग्ण असल्यास तेथील रुग्ण इतर सेंटरवर पाठवून कोविड केअर सेंटर बंद करावे आणि तेथील कंत्राटी मनुष्यबळ कमी करावे, अशा सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनी दिल्यात. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये गेल्या आठ दिवसांपासून एकही रुग्ण नसल्याने सर्व सेंटर बंद करून ते मूळ विभागाकडे सोपविण्याचा आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी निर्गमित केला. त्या आदेशाची अंमलबजावणी करून सीसीसी सेंटर ‘लॉक’ करण्यात आले आहे.
सीईओंच्या अध्यक्षतेत होते व्यवस्थापन- जिल्ह्यातील १९ कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापनाकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली होती. त्यांचे सहाय्यक म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील तांत्रिक अधिकारी डॉ.बी.व्ही.वंजारी कार्यरत होते. पहिल्या लाटेपासून तर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करुन त्यांना सुखरुप घरी पोहोचविले.
क्रीडा संकुलातील केंद्र राहणार कायम- जिल्हा कारागृहामध्ये रोज आरोपी दाखल होत असल्याने कोविडबांधित आढळलेल्या बंदीवानाकरिता जिल्हा क्रीडा संकूल येथे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. ते सेंटर बंद न करता कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या हे एकच कोविड केंअर सेंटर सुरु राहणार आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असून आवश्यकता पडल्यास पुन्हा या इमारती अधिग्रहित केल्या जाणार आहेत.
शालेश शिक्षण व क्रीडा विभागाच्या विविध निकषानुसार इय्यता ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटरकरिता अधिग्रहित करण्यात आलेल्या समाजकल्याण विभागाच्या आणि आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा व वसतीगृहांच्या इमारती मुळ विभागास परत करणे आवश्यक आहे. कोविड केअर सेंटरमध्ये ५० टक्के क्षमतेपेक्षा कमी रुग्ण असेल तर ते सेंटर बंद करण्याचे निर्देश दिलेत. आपल्या जिल्ह्यात सेंटरमध्ये सध्या एकही रुग्ण नसल्याने सर्व केंद्र बंद करण्यात आले.डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष, कोविड केअर सेंटर व्यवस्थापन समिती.