तळेगाव (श्यामजीपंत) : येथून जवळच असलेल्या चिस्तूर शिवारातील दौलतपूर शिवारातील शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. येथे अचानक मातीची दरड कोसळल्याने विहिरीत दबून एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. गयाधीन पठाडे असे मृतकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ माजली असून घटनास्थळाकडे नागरिकांची गर्दी वाढत होती.सविस्तर वृत्त असे की, दौलतपूर येथील विठ्ठलराव वानखडे यांच्या शेतामध्ये विहिरीच्या खोदकामला कारंजा तालुक्यातील बोदरठाणा येथील विनोद ढोबळे (२२), दिनेश पठाडे (२३), चंद्रशेखर चौधरी (२५) तसेच गयाधीन रामराव पठाडे (४५) हे मजूर ठेकेदार बाबाराव मसराम यांच्या मार्फत आले होते. विहिरीचे खोदकाम सुरू असताना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विहिरीमध्ये काम सुरू असताना विहिरीतील मातीची दरड कोसळली. यात गयाधीन पठाडे सदर ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सदर घटनेबद्दल तळेगाव पोलिसांना माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळाला तहसीलदार सीमा वाघमारे आणि ठाणेदार दिनेश झांबरे यांनी भेट देत विहिरीतील मलबा काढण्याचे काम सुरू केले होते. वृत्त लिहिस्तोवर मृतदेह विहिरीतून काढण्याचे काम सुरू होते.(वार्ताहर)
विहिरीत दरड कोसळल्याने मजूर ठार
By admin | Published: March 29, 2016 3:17 AM