लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम: पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम हवे असते.परंतु हे कामच मिळत नसल्याने उपसमारीची वेळ आली आहे. परिणामी कामाच्या शोधात पर जिल्ह्यातील मजूरांनी वर्धा जिल्ह्याची वाट धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पर जिल्ह्यातील मजुरांचे जत्थे दाखल झाले आहे.वर्धा जिल्ह्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. या पिकांची सध्या सोगणी व मळणी सुरु आहे. याच कालावधीत कापूस वेचणीलाही सुरुवात होत असल्याने गावागावांमध्ये मजुरांची समस्या भेडसावतात. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात गडचिरोली, वाशिम, पुसद या भागातील मजुरांचे जत्थे गावागावांमध्ये दाखल होत आहे.यात महिला, पुरुष व तरुणांचाही समावेश आहे. दरवर्षी या भागातील मजुर जिल्ह्यात दाखल होऊन सोयाबीन सोगणी, मळणी व कापूस वेचण्याचेही काम करतात. या दिवसांमध्ये हे मजूर गावात मिसळून जात असल्याने गावकऱ्यांसोबत त्यांची चांगलीच ओखळ झाली आहे. त्यामुळे तेच मजुर दरवर्षी गावात येऊन गावातील शेतकऱ्यांच्या कामात हातभार लावतात. तसेच या दरम्यान येणाऱ्या नवरात्री व दिवाळीच्या सणात सहभागी होऊन सहकार्यही करतात. त्यामुळे राहिलं तितके दिवस ते या गावाचा एक भागच होऊन जाते.या मजुरांमुळे शेतकऱ्यांना दिलासाया दिवसामध्ये सर्वच शेतकऱ्यांच्या सोयाबीनची सोगणी व कापसाची वेचणी येत असल्याने मजूरांची कमतरता भासते.परिणामी गावातील मजूरांचेही भाव चांगलेच वाढते. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातील मजुरांचे आगमण झाले की, शेतकऱ्यांचाही भार हलका होतो. त्यांना वेळेत आणि योग्य दरात मजूर उपलब्ध होत असल्याने, या पर जिल्ह्यातील मजूरांमुळे दिलासा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.शेतकरीच करतात राहाण्याची व्यवस्थासोयाबीनच्या सोगणीचे दिवस आले की, गडचिरोली, बालाघाट, वाशिम व पुसद परिसरातील मजूर जिल्ह्यातील विविध खेड्यामध्ये दाखल होतात. सोयाबीनची सोगणीचे काम एकराप्रमाणे घेऊन सर्व मजूर मिळून अल्पावधीच तडीस नेतात. दिवाळीपर्यंत त्यांचे वास्तव्य असते. गावातील शेतकरीच त्यांची राहण्याची व्यवस्था करतात. गावातील जो शेतकरी त्यांना काम देईल त्या शेतकऱ्याचे ते काम पूर्ण करुन दिवाळी करिता आपापल्या गावाला जातात. दिवाळीनंतरही काही मजूर पुन्हा परत येऊन घेतलेले काम पूर्ण करतात.आमच्याकडे धानाचीच शेती असल्याने आमच्याकडे सध्या पाहिजे तसा रोजगार मिळत नाही. घरातीत सदस्यांची संख्याही जास्त असल्याने दररोज कामाला गेल्याशिवाय दोन पैसे हातात पडत नाही. या दिवसांमध्ये वर्धा जिल्ह्यात सोयाबीन व कपाशीमुळे चांगला रोजगार मिळत असल्याने आम्ही परिवारासह इकडे येऊन काम करतो.- रामेश्वर कोरचे, शेतमजूर गडचिरोली
मजुरीच्या शोधात आलेय परजिल्ह्यातील मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:56 PM
पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम हवे असते.परंतु हे कामच मिळत नसल्याने उपसमारीची वेळ आली आहे. परिणामी कामाच्या शोधात पर जिल्ह्यातील मजूरांनी वर्धा जिल्ह्याची वाट धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पर जिल्ह्यातील मजुरांचे जत्थे दाखल झाले आहे.
ठळक मुद्देस्थलांतरण : गावातील कामांना मिळाली गती