लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ थेट वर्धा शहराशेजारील पवनार शेत शिवारापर्यंत पोहोचलेल्या तरुण वाघास मागील पंधरा दिवसांपासून हुडकून काढण्यात वनविभागाला यश आलेले नाही. असे असले तरी हा तरुण वाघ ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा वाघ नेमका कोण याची अधिकची माहिती मिळावी म्हणून वनविभागाच्या वतीने काही छायाचित्र नागपूर येथील वन्यजीव संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. पण २८ दिवस लोटूनही वाघाची ओळख पटलेली नाहीच. वन आणि वन्यजीव संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभावच या तरुण वाघाची ओळख पटविण्यासाठी अडथळा ठरत असल्याचे बोलले जात असून, याप्रकरणी दोन्ही विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य कार्यवाही करण्याची गरज व्यक्त होत आहे.
शिकारीनंतर ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला टायगर- पवनार येथील शेत शिवारात गो-वंशाची शिकार झाल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्च महिन्यात सुरुवातीला घटनास्थळ गाठून अधिकची माहिती घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले. याच ट्रॅप कॅमेऱ्यात नैसर्गिक अधिवासाचा शोध घेणारा एक तरुण वाघ ५ मार्चला कैद झाला. त्यानंतर या वाघाने आंजी (मोठी) शेत शिवारापर्यंत जात यू-टर्न घेत पुन्हा पवनार शिवार गाठून पुन्हा गो-वंशाची शिकार केली. त्यानंतर पुन्हा वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला. हेच छायाचित्र वाघाची ओळख पटावी म्हणून पडताळणीसाठी पाठविण्यात आले आहे. पण वन्यजीव संरक्षण विभागाकडून पाहिजे तसा प्रतिसादच मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
उघड्या विहिरी, विद्युत प्रवाहित तारा धोक्याच्या- नैसर्गिक अधिवासाचा शोध घेणारा तरुण वाघ पवनार शिवारात दर्शन झाल्यानंतर १९ मार्चपासून हा तरुण वाघ बेपत्ता आहे. तो आल्या मार्गाने परत गेला असावा किंवा तो बोर व्याघ्र प्रकल्पातील घनदाट जंगलात गेला असावा असा अंदाज काहींकडून वर्तविला जात आहे. असे असले तरी शेत शिवारांमधील उघड्या विहिरी तसेच प्रवाहित विद्युत तारा या नैसर्गिक अधिवासाचा शोध घेणाऱ्या वाघासाठी धोक्याच्याच आहेत.
तो बीटीआर-८ अन् बीटीआर-१० नव्हेच- पवनार ते आंजी (मोठी) व आंजी (मोठी) ते पवनार असा प्रवास करणारा हा वाघ बोर व्याघ्र प्रकल्पातील बीटीआर-८ किंवा बीटीआर-१० नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.