लोकमत न्यूज नेटवर्क सेलू: सिलिंडरची नोंदणी करताना पूर्वी ई-केवायसीची गरज नव्हती. मात्र, आता सिलिंडरची नोंदणी केल्यावर ज्यांनी ई- केवायसी केली त्यांना नोंदणीनंतर त्यांच्या रजिस्टर मोबाइलवर ओटीपी येतो. ओटीपी आल्यावर त्यांना घरपोच सिलिंडर मिळतो. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर सिलिंडरअभावी वंचित राहण्याची वेळ आली आहे.
यापूर्वी मोबाइलवरून गॅस सिलिंडरची नोंदणी केली की, त्वरितच दुसऱ्या दिवशी दारात सिलिंडर घेऊन गाडी यायची. आता मात्र गॅस सिलिंडर एजन्सीमध्ये जाऊन ई-केवायसी करावी लागते, अशा सूचना यापूर्वीच गॅस एजन्सीधारकांनी सर्व ग्राहकांना दिल्या होत्या. मात्र, अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले. आता ई-केवायसी केल्याशिवाय सिलिंडरचे बुकिंग होत नाही. त्यामुळे गॅस एजन्सीधारक गॅसधारकाच्या पुस्तकाचा नंबर आधारकार्ड, मोबाइल नंबर व डोळ्याचे स्कॅनिंग करून नोंदणी करतात. त्यानंतरच गॅस सिलिंडरसाठी नंबर लावता येतो व हे करण्यासाठी केवळ पाच मिनिटांचा अवधी लागतो. मात्र, सहजपणे मोबाइलवर बुकिंग होत असल्याने गॅस सिलिंडर प्रत्येकाच्या घरी पोहोचत होते. त्यामुळे अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले.
आता दिवाळीच्या तोंडावर सिलिंडरचे बुकिंग होत नसल्याने गॅस एजन्सीमध्ये जाऊन ग्राहक ई-केवायसी करत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर ई-केवायसी झाली नाही तर सिलिंडर मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने अनेकांची दिवाळीच्या तोंडावर या कामासाठी धावपळ सुरू झाली आहे. तर काहींनी सपरनाचा आधार घेतला आहे.
महिला कार्डधारकांना तीन सिलिंडरची रक्कम ज्या महिलेचे नाव उज्ज्वला योजनेत आहे त्यांना शासनाने वर्षाचे तीन सिलिंडर मोफत केले होते. त्यानंतर ज्या महिलेच्या नावावर सिलिंडर बुकात नोंद आहे. त्याही महिलांना तीन सिलिंडरची रक्कम मिळत आहे. यासाठी अनेक पुरुष आपल्या नावावरील गॅस कनेक्शन घरच्या महिलेच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करत असले, तरी सध्या ही प्रक्रिया गॅस एजन्सीधारकांकडून बंद आहे. ती दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे सांगितले जाते.