वाहनधारक त्रस्त : कारवाईसाठी दिले वाहतूक विभागाला पत्र लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मध्य रेल्वेच्या वर्धा स्थानकावरसमोर पार्कींगकरिता कुठेही जागा ठेवण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना सोडयला आलेले किंवा आरक्षण करण्यासाठी आलेले वाहन धारक रेल्वे पोलीस ठाण्यापुढे त्यांची वाहने उभी करतात. येथे उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करीत असल्याने वाहन धारक त्रस्त झाले आहेत. पार्कींगची सुविधा करण्याऐवजी कारवाइसाठी रेल्वे प्रशासन आमंत्रण देत असल्याचा प्रकार यातून समोर आला आहे. रेल्वेस्थानक परिसरात यापूर्वी पे अॅण्ड पार्क ची व्यवस्था होती. येथे प्रवासी वाहने उभी करत होते. ही व्यवस्था आता पेट्रोलपंपच्या मागील बाजुस करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांसाठी टिकिट घराच्यामागे वाहन ठेवण्याची व्यवस्था केली. येथे जाण्याकरिता पेट्रोलपंपच्या बाजूने रस्ता केला आहे. अल्पशा कामाकरिता आलेले नागरिक तेथे वाहने ठेवत नाही. याच वाहनांवर कारवाई केली जात आहे. एक महिन्यांपूर्वी काही दुचाकींवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. यावर आक्षेप घेत तत्कालीन रेल्वे पोलीस निरीक्षक नालट यांच्याकडे तक्रार करण्यात आली असता त्यांनी वाहतूक पोलिसांनी रेल्वे आवारात कारवाई करू नये, अशा सूचना वाहतूक पोलिसांना दिल्या होत्या. यामुळे वाहतूक पोलीस निरक्षक गुरव यांनी रेल्वेच्या आवारातील कारवाई बंद केली होती. परिणामी प्रवाशांना दिलासा मिळाला होता. काही दिवसांपूर्वी रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांनी पाहणी केली असता रेल्वे पोलीस स्टेशनसमोर त्यांना वाहने उभी असल्याचे दिसले. यावरुन त्यांनी रेल्वे पोलिसांना धारेवर धरले. परिणामी रेल्वे पोलिस निरीक्षक डोंगरे यांनी वाहतूक पोलिसांनी पुन्हा कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत तत्सम पत्रही वाहतूक पोलिसांना देण्यात आले. यामुळे वाहनांवर पुन्हा कारवाई सुरु करण्यात आली आहे. याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वेस्थानकावर पार्कींगचा अभाव
By admin | Published: July 08, 2017 12:23 AM