नाचणगावातील प्रकार : रस्ते, प्रकाश व्यवस्थेकडे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : नवीन वसाहती स्थापन होऊन गावांचा विकास होऊ लागला आहे. परिणामी, ग्रा.पं. प्रशासनाचे उत्पन्नही वाढीस लागले आहे; पण त्या प्रमाणात सुविधा पुरविल्या जात नसल्याची ओरड सर्वत्र आहे. लगतच्या नाचणगाव या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या १७ सदस्यीय ग्रा.पं. मध्येही हा प्रकार पाहावयास मिळत आहे. नागरी सुविधा नसल्याने कर अदा करणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. नाचणगाव ग्रा.पं. चे क्षेत्र वाढत असतानाच ग्रामस्थांच्या समस्या व तक्रारीही वाढत आहे. ग्रा.पं. ला सर्वाधिक वार्षिक महसूल देणारा भाग म्हणजे पुलगाव शहरालगत असणाऱ्या वसाहती होय. या भागातील ग्रामस्थांना सार्वजनिक आरोग्य सेवा, स्वच्छता, दळणवळण, पाणी पुरवठा, प्रकाश व्यवस्था आदी मुलभूत सेवा पुरविणे हे ग्रा.पं. प्रशासनाचे कर्तव्य आहे; पण मागील काही महिन्यांपासून या नवीन वसाहतीतील ग्रामस्थांना प्रकाश व्यवस्था व दळणवळणाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. याकडे ग्रा.पं. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. या ग्रा.पं. क्षेत्रातील बिरे ले-आऊट, विजयश्री कॉलनी (साबळे ले-आऊट), मुंधडा कॉलनी, मिरा कॉलनी (ले-आऊट), गाडगेनगर या भागातून द्रुतगती मार्गाकडे रस्ता काढण्यात आलेला आहे. दशकापूर्वी या नवीन वसाहतीमध्ये ५५ लाख रुपये खर्चाचे जवळपास ४५ जोडरस्ते काढण्यात आले होते; पण त्यातील बहुतेक रस्त्यांचे खडीकरण करण्यात आले होते. पावसाळ्यात या मार्गातील मुरूम वाहून गेल्यामुळे रस्ते खड्ड्यांनी व्यापले होेते. पैकी काही रस्त्यांचे डांबरीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले होते; पण पावसामुळे या रस्त्यांनी आपले अंतरंग उघड केले आहे. या भागातून साई मंदिर, रामदेव बाबा मंदिर, कला व विज्ञान महाविद्यालय, इंडियन स्कूल आॅफ स्कॉलर्स, फॉर्मसी कॉलेज शारीरिक शिक्षण महाविद्यालय, विवेकानंद विद्यालयासह शिकवणी वर्गांकडे विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची ये-जा असते; पण गिट्टी उघडी पडलेले व ्नखड्ड्यांचे रस्ते आणि त्यावर साचलेले पाण्याचे डबके यामुळे अनेक समस्यांना तोंडे द्यावे लागत आहे. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने दुर्गंधीही पसरली आहे. या नवीन वसाहतीच्या प्रभागात सहा ग्रामपंचायत सदस्य आहेत. या सदस्यांसह ग्रा.पं. प्रशासनाकडे अनेकदा नागरिकांनी तक्रारी केल्यात; पण कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. ग्रा.पं. प्रशासनाने या भागातील समस्यांकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे. कुणीही, कधीही करतात पथदिवे सुरू-बंद नाचणगाव ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या नवीन वसाहतींच्या भागात विद्युत खांब तथा पथदिवे आहेत; पण रात्री हे दिवे बंद असतात. यामुळे ग्रामस्थांना काळोखातून मार्ग काढावा लागत असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करतात. हे पथदिवे कधीही आणि कुणीही सुरू करतात. बरेचदा दिवसाही पथदिवे सुरूच असतात. मग, कुणाच्या लक्षात आल्यास ते ग्रामस्थ आपले कर्तव्य बजावतात. हा प्रकार रोखून कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
नवीन वसाहतींमध्ये नागरी सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:48 AM