वर्धा : शासकीय आरोग्य सेवेतील महत्त्वाच्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या पाण्याचा अभाव आहे़ यामुळे रुग्णांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ प्रशासकीय उदासिनता रुग्णालयास पाणी पुरवठा करण्याच्या आड येत असल्याचे दिसते़ संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत जिल्हा सामान्य रुग्णालयातील पाणी टंचाई दूर करणे गरजेचे झाले आहे़सामान्य रुग्णालय पालिकेच्या हद्दीत आहे; पण या येथे पाणी पुरवठा केला जात नाही़ रुग्णालयातील पूर्वीच्या जुन्या दोन विहिरींतूनच आजही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागत असल्याची खंत जिल्हा शल्यचिकित्सकांनी व्यक्त केली़ सामान्य रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांची गर्दी वाढत आहे़ या तुलनेत पिण्याच्या पाण्याची कमतरता दिसून येते़ लाखो रुग्णांवर उपचार करणाऱ्या सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, तशी व्यवस्था करणे, ही पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे; पण त्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याचेच दिसते़ जिल्हा सामान्य रुग्णालय हे वर्धा जिल्ह्यातील मोठे रुग्णालय आहे़ दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे़ यामुळे रुग्णालयाची इमारतही वाढविण्यात आली; पण संबंधित प्रशासन महत्त्वाची पिण्याच्या पाण्याची सोय करून देत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ महाराष्ट्र जीवन प्राधीकरण वर्धा यांच्याकडे सुमारे चार महिन्यांपूर्वी पाण्याची पाईपलाईन टाकण्याकरिता ६५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे़ निधी दिल्यानंतर काम होणे अपेक्षित होते; पण जीवन प्राधिकरणने अद्यापही पाईपलाईन टाकली नाही़ शिवाय नगर परिषदेकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने सदर कामाला विलंब होत असल्याचे सांगितले जाते़ जीवन प्राधिकरणची अडचण नसल्याचे विद्यमान जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ़ राठोड यांनी सांगितले़ नगर परिषदेने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याशिवाय सदर पाईपलाईन टाकता येणार नसल्याची भूमिका जीवन प्राधिकरणने घेतली आहे़ यामुळे रुग्णालयात पाणीटंचाई तीव्र होत आहे़ रुग्णालयात पाणी नसल्याने रुग्णांना पाण्याच्या शोधात भटकावे लागते़ सामान्य नागरिक व रुग्णांच्या सुविधेकरिता महत्त्वाचा असलेला हा विषय कुणीही गंभीरतेने घेताना दिसत नाही़ याकडे लक्ष देत रुग्णालयास पाणी पुरवठा करावा, अशी मागणी बापू युवा संघटनेचे सुरेश पट्टेवार यांनी केली आहे़(स्थानिक प्रतिनिधी)
सामान्य रुग्णालयात पाण्याचा अभाव
By admin | Published: April 08, 2015 1:56 AM