वर्धेत घरफोडी : हिंगणघाट येथे सोन्या-चांदीच्या ऐवजासह केबल पळविला लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात गुरुवारची रात्र चोरट्यांची रात्र ठरली. वर्धेत झालेल्या घरफोडीत ४.४० लाखांचा ऐवज लंपास झाला तर हिंगणघाट येथे झालेल्या एका चोरीत १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला. तर दुसऱ्या चोरीत चोरट्याने ३५ हजार रुपयांचा केबल लंपास केला. तिनही घटनेत पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या असून तपास सुरू आहे. वर्धा शहरानजीकच्या रमानगर येथील रमाकांत मोरोणे यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्याने २ लाखाच्या रोखसह सोन्या-चांदीचा ऐवज असा एकूण ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. रमानगर येथील रमाकांत मोरोणे हे कुटुंबियासह बाहेर गावी गेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरातील कपाटातील साहित्याची फेकफाक केली. यावेळी चोरट्याच्या हाती २ लाख ७५ हजार रुपयांची रोकड लागली. शिवाय सोन्या-चांदीचे ऐवजही मिळून आला. मोराणे शुक्रवारी घरी परतल्यावर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच रामनगर ठाण्याचे निरीक्षक विजय मगर आपल्या चमुसह दाखल झाले. सदर घटनास्थळ सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने सेवाग्राम पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. चोरट्यांनी मोरोणे यांच्या घरातून काही महत्त्वाचे दस्ताऐवज असलेली बॅगही पळविल्याचे सांगण्यात आले. या घटनेची सेवाग्राम पोलिसांनी नोंद घेतली आहे. श्वानपथकही अपयशी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसातर्फे माहिती मिळताच श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. यावेळी श्वान पथकाच्या चमुने चोरटा कुठून आला व कुठल्या दिशेने निघुन गेला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही. वृत्तलिहेपर्यंत पोलिसांना कुठलाही सुगावा लागला नसल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. यामुळे चोरटा पकडण्याकरिता पोलिसांना आव्हान ठरत आहे.
तीन चोऱ्यांत ६ लाखांचा ऐवज लंपास
By admin | Published: May 20, 2017 2:08 AM