नाके कुलूपबंद : चोरीच्या घटनांत वाढ आकोली : खरांगणा वनपरिक्षेत्रात साग वृक्षांचे विस्तीर्ण जंगल आहे. यामुळे चोरीच्या घटनाही होतात. यापूर्वी लाखो रुपयांचे सागवान चोरीत एकाला अटकही झाली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे मंजुरी मिळवून सागवान चोरीच्या घटना होऊन काहींवर गुन्हे दाखल झाले होते. ‘लोकमत’ने सदर घटनांचा पाठपुरावा केला होता. चोरीच्या घटना पाहून वनविभागाने शहाणे होत वन नाके सुरू ठेवणे गरजेचे होते; पण बहुतांश नाके कुलूपबंद आढळून आले. वनसंपत्तीची चोरी रोखण्याकरिता वननाके उपयुक्त ठरतात; पण सदर वनपरिक्षेत्रात फेरफटका मारला असता बोरखेडी व खरांगणा नजीकचा वन नाका कुलूपबंद दिसला. यामुळे वनविभागाने चोरट्यांसाठी रान मोकळे केल्याचेच दिसून येते. जंगलाचा फेरफटका मारला असता कुठेही गस्त आढळून आली नाही. लोकमत वृत्तामुळे काही महिन्यांपूर्वी जंगलात तोडून ठेवलेला सागाचा साठा उघड झाला. दबाव वाढताच एकावर फौजदारी कारवाई केली. यात वन कोठडी घेण्यात आली नाही आणि आरोपी व साथीदाराची नावेही घेण्यात आली नाही. दुसऱ्या एका प्रकरणात तर खोटे दस्तावेज तयार करून सागवान तोडण्याचा गैरप्रकार घडला. या प्रकरणात फसणुकीचा गुन्हा दाखल झाला. एवढ्या गंभीर घटना उजेडात येऊनही वन नाके २४ तास उघडे ठेवण्याबाबत उदासीनताच दिसते. नाके कुलूपबंद असल्याने बिनबोभाट सागाची ने-आण होत नाही, असे म्हणता येणार नाही. तैनात असलेले नाक्यावरील कर्मचारी कर्तव्य पालन करतात की, गायब राहतात, हे कोण तपासणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. वनरक्षक जंगलात पाय ठेवत नाही. जंगलात काय घडते, याचा मागपुसही त्यांना नसतो. ते घरी वा वनपरिक्षेत्र कार्यालय व सहवनक्षेत्र कार्यालयातच असतात. एखाद्या घोरपड शिकारीची वा सागवान चोरीची घटना केवळ सदर व्यक्ती रस्त्यात भेटल्यास वा विरोधकांनी माहिती दिल्यास उघड होते. शिकारी, चोरी दररोज होत नाही, असा आभास अधिकाऱ्यांपूढे उभा केला जातो. आपल्या बिटात, सहवनक्षेत्रात, वनपरिक्षेत्रात चोरी, शिकार होत नाही, हे दाखविण्यासाठी घटनांवरही पांघरून घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही दिसते. खरांगणा वन परिक्षेत्रात सुरू असलेल्या या प्रकाराकडे उपवन संरक्षक यांनी जातीने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे. शिवाय वन नाके सुरू करून जंगलाच्या संरक्षणासाठी संबंधितांना समज देणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)
वनविभागाची लाखोंची संपत्ती वाऱ्यावर
By admin | Published: July 24, 2016 12:23 AM