वर्धा, दि. 18 - वर्ध्यातील लोहमार्ग पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना १२१३९ क्रमांकाच्या मुंबई-नागपूर या सेवाग्राम एक्स्प्रेसमधून ताब्यात घेतले आहे. संशयास्पद हालचाली पाहता त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. यावेळी दोघांकडून पोलिसांनी दोन महागड्या मोबाइलसह एक बॅग जप्त केली आहे. सत्यम नरेंद्रसिंग ठाकूर (राजपूत) व दिलीप दशरथसिंग गौतम (ठाकूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघंही मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत.
स्थानिक हिंदनगर येथील भुषण रमेश कोहाड हा मुंबई ते वर्धा सेवाग्राम एक्स्प्रेसने प्रवास करत असताना रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्याची बॅग पळविली. सदर प्रकार पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्याच्या लक्षात येताच त्याने घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी बॅगचा शोध घेतला असता बॅग सेवाग्राम एक्सप्रेसमधील एस ९ क्रमांकाच्या डब्ब्यात आढळून आली.याच डब्यात दोन तरुण संशयास्पद हालचाली करीत असल्याचे लक्षात येताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरूवातीला उडवा-उडवीचे उत्तरे देणा-या तरुणांना पोलिसी हिसका मिळताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून वर्धा लोहमार्ग पोलिसांनी भुषणच्या मालकीची असलेली बॅग व दोन महागडे मोबाइल जप्त केले आहे. ही कारवाई वर्धा लोहमार्ग पोलीस स्टेशनचे ठाणेदार एस. पी. डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गनोरकर, गजु टाले, विजय मुंजेवार, सविता मेश्राम, कैलास भांडारकर, राहुल येवले, नितीन शेंडे यांनी केली.
घरफोड्याचेही गुन्हे दाखलसदर चोरट्यांनी एक मोबाइल पुणे येथून तर दुसरा महागडा मोबाइल पनवेल येथून लंपास केल्याची कबुली वर्धा लोहमार्ग पोलिसांना दिली आहे. अटकेत असलेले दोन्ही आरोपी छिंदवाडा येथील अट्टल चोरटे आहेत. या दोघांविरोधात विरुद्ध मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यात घरफोडीचेही गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले.