वर्धा : शासनाने गावे हागणदारीमुक्त व्हावीत व स्वच्छता राखून आजारांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी निर्मलग्राम योजना हाती घेतली़ यासाठी प्रत्येक गावात १०० टक्के शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले; पण अनेक गावांत पुरूषांनी पुढाकार घेतला नाही़ यामुळे सेलू तालुक्यातील आमगाव (खडकी) च्या महिलांनी आपल्या पतींविरूद्धच चुलबंद आंदोलन पुकारले़ तीन दिवस चाललेल्या या आंदोलनाचा धसका घेत अनेकांनी शौचालय बांधकाम सुरू केले़ यामुळे हे आंदोलन आमगावपूरते मर्यादित न ठेवता वर्धा उपविभागात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला़ शिवाय शेतीच्या कामांसाठी तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले़ग्रामीण भागातील नागरिक घरांचे बांधकाम करतात; पण त्यात शौचालय अंतर्भुत करीत नाहीत़ यामुळे महिला, युवतींना उघड्यावर शौचास बसावे लागते़ यात अस्वच्छतेमुळे अनेक आजार जडतात़ शिवाय महिलांचा दागिना असलेली ‘लाज’ही वेशीवर टांगली जाते़ या सर्वांचा तिटकारा आल्याने आमगाव (खडकी) येथील महिलांनी उत्स्फूर्तपणे किसान अधिकार अभियानच्या नेतृत्वात जोपर्यंत शौचालय बांधले जात नाही, तोपर्यंत स्वयंपाकच करणार नाही, असा निर्णय घेत चुलबंद आंदोलन सुरू आहे़ तीन दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे पुरूषांवर स्वयंपाक करून अन्य कामे करण्याची वेळ आली आहे़ स्वयंपाक करणे, मुलांना जेवण देणे, आपल्या पत्नी, आईला डबा देणे व त्यानंतर शेतातील कामे करण्याची वेळ आल्याने पुरूष मंडळी मेटाकुटीस आली होती़ या आंदोलनाचा धसका घेत आमगाव येथील अनेक पुरूषांनी शौचालय बांधकामास सुरूवातही केली़ या अभिनव आंदोलनामुळे आमगाव १०० टक्के हागणदारी मुक्त होऊ शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे़ग्रामीण भागात अनेकांच्या घरी शौचालये आहेत; पण ग्रामस्थ त्याचा वापर करीत नाही़ निर्मलग्राम योजनेंतर्गत बांधलेल्या शौचालयात अनेकांनी इंधन ठेवल्याचेही प्रकार आढळून येतात़ या प्रकारामुळे उघड्यावर शौचविधी आटोपण्याची मानसिकता जात नसल्याचे दिसते़ आमगाव येथील महिलांनी घेतलेल्या पुढाकाराचे अधिकाऱ्यांनीही कौतुक करीत या निर्णयांमुळे १०० टक्के शौचालयांचे उद्दीष्ट साध्य होऊ शकेल, असे मत व्यक्त केले आहे़ आंदोलनात निर्मला ठाकरे, फुला पवार, आरती पवार, विद्या मरस्कोल्हे, शीला चव्हाण, लीला जाधव, पूजा पवार, जयश्री पवार, सत्यभामा पवार, इंदू मसराम, शालिनी ठाकरे, रेखा पवार, समाधान पवार, अनिल तेलरांधे, जयराम पवार, गोविंदा पवार, चंद्रभान आत्राम, अक्षय पवार, देवलाल चव्हाण, सुरेश मोहिते, पद्माकर मरस्कोेल्हे यांनी सहभाग घेतला़ किसान अधिकार अभियानने ग्रामीण भागातील पेरण्या व शेतीची कामे लक्षात घेत हे आंदोलन तुर्तास स्थगित केले़ हे आंदोलन आमगाव पूरतेच मर्यादित न ठेवता वर्धा उपविभागात म्हणजे सेलू, देवळी व वर्धा तालुक्यात राबविले जाणार असल्याचे अविनाश काकडे यांनी सांगितले़ शेतीची कामे आटोपत येताच वर्धा उपविभागात महिलांद्वारे पुन्हा गावोगावी चुलबंद आंदोलन करण्यात येणार आहे़ किमान या आंदोलनांचा आधार मिळून निर्मलग्राम योजना यशस्वी होईल, अशी आशा पदाधिकारी व अधिकारी व्यक्त करीत आहेत़ हे आंदोलन अन्य ठिकाणीही केले जाणार आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
आमगावात शौचालय बांधकामांना प्रारंभ
By admin | Published: June 28, 2014 11:43 PM