लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नकोशी झालेल्या चार महिन्याच्या चिमुकलीला धावत्या रेल्वे गाडीत सोडून देण्यात आले. पालकांना नकोशी झालेली ही ‘लक्ष्मी’ (काल्पनीक नाव) वर्धा लोहमार्ग पोलिसांनी वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेत तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सदर चिमुकलीच्या आईला हुडकून काढण्यात वर्धा लोहमार्ग पोलिसांना अवघ्या काही तासात यश आले आहे. हतबल झालेली लक्ष्मीची आई तिला नागपूर-अमरावती या रेल्वे गाडीत सोडून सेवाग्राम रेल्वे स्थानकावर उतरल्याचे लोहमार्ग पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील मुळ रहिवासी असलेल्या योगीता योगेश योगराजे (काल्पनीक नाव) हिचे गुजरात येथील रहिवासी असलेल्या योगेश योगराजे याच्यांशी सुमारे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर काही वर्षांनी योगीता व योगेश यांच्यात पटत नसल्याने योगीता ही अकोला जिल्ह्यात परतली. ज्यावेळी योगीता अकोला जिल्ह्यात परतली त्यावेळी ती गरोदर होती. ती पती पासून वेगळी होत अकोला जिल्ह्यातील गोंदापूर येथे गत काही दिवसांपासून राहत होती. याच दरम्यान तिने तिच्या राहत्या घरी गोंडस अशा मुलीला जन्म दिला; पण आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने योगीताने आपल्या मुलीला सोबत घेवून रोजगारासाठी नागपूर गाठले. तेथे तिने कामाचा शोध घेतला. यावेळी तिच्याजवळ लहानशी मुलगी असल्याने कुणीही तिला काम देण्यास तयार झाले नाही. आपल्या हाताला काम नाही, त्यातच खांद्यावर लहान मुलगी अशा विवंचनेत योगीताने नागपूर-अमरावती पॅसेंजरने परतीचा प्रवास सुरू केला. याच प्रवासादरम्यान योगीताने पोटच्या चार महिन्याच्या मुलीला सेवाग्राम रेल्वे स्थानक येताच तिला रेल्वे गाडीत सोडून तेथून पळ काढला. दरम्यान बेवारस स्थितीत असलेले छोटेसे बाळ रडत असल्याचे दोन प्रवाशांना दिसल्याने त्यांनी घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर सदर रेल्वे गाडी वर्धा येथे येताच लक्ष्मीला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेत तिच्या आईचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान खात्रिदायक माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी सेवाग्राम रेल्वे स्थानक आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रिकरण तपासले. त्यात एक संशयीत महिला आढळून आली. त्यानंतर तिचा शोध घेण्यास लोहमार्ग पोलिसांनी सुरूवात केली. याचदरम्यान सदर संशयीत महिला वर्धा रेल्वे स्थानकाच्या आवारात आली. याच वेळी वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सविता मेश्राम याच्या चहा पिण्यासाठी पोलीस ठाण्यासमोरील दुकानात जात असताना त्यांना ही संशयीत महिला आढळून आली. तिला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता तिने संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता नेले असता तिला वैद्यकीय अधिकाºयांनी रुग्णालयात दाखल करून घेतले. लक्ष्मीची आई सदर संशीत महिलाच आहे काय याची शहानिशा करण्यासाठी वर्धा लोहमार्ग पोलीस डी.एन.ए. चाचणी करणार असल्याचे वर्धा लोहमार्ग पोलिसांच्या अधिकाºयांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन वडते यांच्या मार्गदर्शनात वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक देवानंद मंडलवार करीत आहेत.
लोहमार्ग पोलिसांना गवसली ‘लक्ष्मी’ची आई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 11:44 PM
नकोशी झालेल्या चार महिन्याच्या चिमुकलीला धावत्या रेल्वे गाडीत सोडून देण्यात आले. पालकांना नकोशी झालेली ही ‘लक्ष्मी’ (काल्पनीक नाव) वर्धा लोहमार्ग पोलिसांनी वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेत तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
ठळक मुद्देसीसीटीव्ही चित्रिकरण ठरले फायद्याचे : हतबल झाल्याने सोडले चार महिन्याच्या चिमुकलीला