अडेल नेते; निरुत्साही कार्यकर्ते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 10:26 PM2018-09-06T22:26:34+5:302018-09-06T22:27:00+5:30
काँग्रेसच्यावतीने राज्यात युवक काँग्रेसच्या निवडणूका घेण्यात येत आहे.जिल्ह्यातही या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात आली असून तीन दिवस मतदार संघनिहाय हा रणसंग्राम चालणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : काँग्रेसच्यावतीने राज्यात युवक काँग्रेसच्या निवडणूका घेण्यात येत आहे.जिल्ह्यातही या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात आली असून तीन दिवस मतदार संघनिहाय हा रणसंग्राम चालणार आहे. परंतू निवडणुकीतील ओसरलेला उत्साह पाहून या निवडणुकीवरही सत्ता आणि नेत्यांचा अडेलपणाचा प्रभाव पडल्याची ओरड काही कार्यकर्त्यांकडून होत आहे.
भाजपाच्या लाटेतही कॉग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात पक्षाचे वर्चस्व कायम ठेवण्यात यश आले. आमदार रणजित कांबळे, आमदार अमर काळे व माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे हे काँग्रेसचे तीन नेते आहे. ज्येष्ठ नेता म्हणून आ. कांबळे यांच्याच खांद्यावर पक्षाची त्यांनी जबाबदारी घेतली आहे. परंतु या तिनही नेत्यामध्ये काहीसी फारकत असल्याचे वारंवार पुढे आले आहे. आता युवक काँग्रेसच्या निवडणुकीतही पुन्हा मतभेद उघड झाले आहे. आर्वी विधानसभा मतदार संघातून युवक काँग्रेसची सदस्य नोंदणी झाली, पण ती फारच अत्यल्पच आहे. त्यामुळे या मतदार संघात विधानसभा अध्यक्षपदासाठी एकही उमेदवार ठरविण्यात आला नाही. त्यामुळे आर्वी, आष्टी व कारंजा या तिनही तालुक्यात युवक काँग्रेस पर्यायाने काँग्रेसप्रती कार्यकर्त्यांमध्ये निरु त्साह तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकेकाळी युवक कॉग्रेसच्या निवडणुकीचा वेगळाच धडका असायचा पण, नेत्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे कार्यकर्तेही निरुत्साह झाल्याची चर्चा आहे.
कांबळे व शेंडे गट आमने-सामने
जिल्ह्यात युवक कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तसेच विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाकरिता आमदार कांबळे गटाचे वीपीन राऊत तर शेंडे गटाचे गौरव देशमुख हे आमने-सामने उभे ठाकले आहे. या दोघांनाही आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा विधानसभेतील युवक काँग्रेसचे सदस्य मतदान करणार असून कुणाचे पारडे जड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आर्वीत कमी तर वर्ध्यात सर्वाधिक मतदार
विधानसभा क्षेत्रानिहाय सदस्य नोंदणी करण्यात आली. त्यानंतर उमदेवार निश्चित करण्यात आले. यात सर्वात कमी ७० सदस्य नोंदणी ही आर्वी तालुक्यात झाली. तर सर्वाधिक सदस्य नोंदणी वर्धा विधानसभेत केली आहे. वर्ध्यात १ हजार १८९, देवळीत ८५० तर हिंगणघाटमध्ये १७७ सदस्यांची नोंद करण्यात आली आहे. हे सर्व २ हजार २८६ मतदार जिल्हाध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान करतील. तर प्रत्येक विधानसभेतील मतदार हा विधानसभा अध्यक्षाला मतदान करणार आहे.
आर्वी विधानसभेत अध्यक्षच नसणार
जिल्ह्यातील युवक काँग्रेसचा वर्धा विधानसभा अध्यक्ष, हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष, देवळी विधानसभा अध्यक्ष व आर्वी विधानसभा अध्यक्षासह जिल्हाध्यक्ष निवडण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्षपदाकरिता दोन उमेदवार रिंंगणात असून यातील एकाचा विजय निश्चित आहे. वर्धा विधानसभा अध्यक्षाकरिता विराज शिंदे व कुणाल भाकरे, हिंगणघाटकरिता नकूल भाईमारे व निखिल श्रीवास तर देवळी विधानसभाध्यक्षाकरिता निलेश ज्योत हा एकमेव उमेदवार असल्याने त्याची अविरोध निवड होईल.मात्र आर्वी विधानसभा क्षेत्रात एकही उमेदवार नाही. त्या मतदार संघात विद्यमान आमदार कॉग्रेसचे असतानाही मिळालेला नाही ही परिस्थिती पक्षासाठी चिंताजनक आहे.
असे होणार मतदान
युवक कॉंग्रेसची निवडणूक प्रक्रिया तीन दिवस चालणार आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धनपाल नेगी हे जिल्ह्यातील जबाबदारी सांभाळणार आहे. ९ सप्टेंबर रोजी देवळी विधानसभा, १० रोजी आर्वी व हिंगणघाट तर ११ सप्टेंबरला वर्धा विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.