वर्धा : सेलू (घोराड) तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेलू नगर पंचायतीवर काही महिन्यांपासून असलेली प्रशासकीय राजवट पाहता व कोरोना संसर्ग कमी झाल्याचे दिसून येत असल्याने निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, अशी आशा राजकीय नेत्यांना असल्याने राजकीय पुढारी कामाला लागल्याचे दिसून येत आहे. तर जिल्हा परिषदेची मुदत अवघ्या काही महिन्यांत संपणार असल्याने ग्रामीण भागातील नेते व संभाव्य उमेदवारदेखील कामाला लागले आहेत.
नगर पंचायत निवडणुकीत काही महिन्यांपूर्वी प्रभागातील उमेदवार हे राजकीय गटाने ठरविले होते. संभाव्य उमेदवार सक्रिय झाले असताना कोरोनामुळे निवडणुका स्थगीत झाल्याने हिरमोड झाला होता. आता निवडणुकांचे पडघम सुरू होणार असल्याची खात्री झाल्याने सेलू शहरात दप्तरी गट, भाजप, काँग्रेस (जयस्वाल गट), असे तीन गट उमेदवार लढविणार होते. यावेळी राजकीय गटात भर पडणार असून रवींद्र कोटंबकर यावेळी १७ प्रभागात उमेदवार उतरविणार असल्याने निवडणुकीत चुरस वाढणार हे नक्की. पण राष्ट्रवादी काँग्रेस ही सेलू नगर पंचायत निवडणुकीत आपले उमेदवार लढविणार असल्याने उमेदवारांची गर्दी व मतदाराची मांदियाळी ही निवडणूक ठरणार असल्याचे बोलल्या जात आहे .
तर काही महिन्यांवर असलेल्या जिल्हा परिषद निवडणूक लक्षात घेता काही गटात मी उमेदवार असल्याचे सांगून मतदाराचे अडले नडले कामे संभाव्य उमेदवार करून देत असल्याचे दिसून येते. तर, काही मुरब्बी राजकारणी आरक्षणाच्या सोडतीची प्रतीक्षा करीत आहेत, हे मात्र तेवढेच खरे असले तरी सेलू तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांत जे उमेदवार निवडून आले त्यापैकी काही मतदारसंघात सदस्यांनी फिरकूनही पाहिले नाही.
अशातच नव्या उमेदवाराला मतदारांची पसंती पाहता जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा व काँगेस अशीच लढत अपेक्षित राहणार आहे. त्यासाठी हिंगणी, केळझर व सुकळी स्टे. येळाकेळी हे मतदारसंघ महत्त्वाचे ठरणार आहेत. तालुक्यात पप्पू जयस्वाल यांचा असलेला जनसंपर्क व आमदार भोयर यांनी तालुक्यात केलेला विकास पाहता हे दोन नेते प्रभावी ठरणार आहेत. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर सेलू नगर पंचायत निवडणूक तालुक्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.