लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन मध्ये वास्तव्य करणाऱ्या वाघांना विशिष्ट क्रमांक देत त्यांची नोंद व्याघ्र प्रकल्प प्रशासन घेते. परंतु, यंदाच्या वर्षी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक वाघाची नोंद घेत त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. तशा सूचना वन्यजीव विभागाकडून देण्यात आल्या असून वरिष्ठांच्या सूचनेवरूनच प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी यंदाच्या उन्हाळ्यात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून पट्टेदार वाघांबाबतची माहिती गोळा करणार आहेत. सर्वेक्षणाअंती ही माहिती पुढील कार्यवाहीसाठी बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाकडे वळती केली जाणार आहे.देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. तब्बल १३८ चौरस किमीच्या या व्याघ्र प्रकल्पात सुमारे सहा प्रौढ वाघ, दहाहून अधिक बिबट, एक हजारहून अधिक हरण, १४ अस्वल, २८ रानकुत्रे, एक रानगव्हा, सांबर, नीलगाय, मोर आदी वन्यप्राणी व पक्षी आहेत. आतापर्यंत बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन मध्ये वास्तव्यास असलेल्या वाघांची माहिती घेत त्यांना विशिष्ट क्रमांक दिला जात होता. परंतु, यंदाच्या वर्षी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या प्रादेशिकच्या जंगलात नेमके किती वाघ आहेत याचीही माहिती घेतली जाणार आहे. तशा सूचना वन्यजीव विभागाकडून प्राप्त झाल्या आहेत. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वरिष्ठांच्या सूचनेवरून आता वर्धा जिल्ह्यातील खरांगणा, आर्वी, हिंगणी, कारंजा (घा.) तसेच नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि कोंढाळी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यंदाच्या उन्हाळ्यात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून वाघांबाबातची माहिती गोळा करणार आहेत. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर सदरची माहिती पुढील कार्यवाहीसाठी बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाकडे वळती केली जाईल.
आतापर्यंत व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये वास्तव्य करणाऱ्या वाघांची माहिती घेवून त्यांना विशिष्ट क्रमांक दिला जात होता. परंतु, यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात वन्यजीव विभागाकडून व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधीलही वाघांची माहिती गोळा करण्याबाबतच्या सूचना आहेत. या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून प्रादेशिकचे अधिकारी व कर्मचारी नक्कीच कार्यवाही करतील.- नीलेश गावंडे,वनपरिक्षेत्र अधिकारी, बोर व्याघ्र प्रकल्प.