दोन वर्षांपूर्वीच झाले बांधकाम : बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्हकारंजा (घा.) : .शहरात दोन कोटी रूपये खर्चून पोलीस स्टेशन परिसरात दोन सदनिका निर्माण करण्यात आल्या यातील एक इमारत वर्षंभरापूर्वी पोलीस स्टेशनला हस्तांतरित करण्यात आली. पण या इमारतीमधील काही घरांमध्ये गळती सुरू झाली आहे. त्यामुळे सदनिकांच्या बांधकामाच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. या गळक्या वसाहतींची तात्काळ दुरूस्ती करावी याकरिता संबंधीत अभियंत्यांना लेखी तक्रारही ठाणेदार विनोद चौधरी यांनी केली. पण अद्यापही दुरूस्ती न करता टाळाटाळ होत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.पोलीस कर्मचारी व ठाणेदार यांच्या निवासाची सोय व्हावी म्हणून, कारंजा पोलीस स्टेशन परिसरात जवळपास दोन कोटी रूपये खर्चून दोन सदनिका बांधण्यात आल्या. यातील क्रं. १ च्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून ती पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आली. या इमारतीत एकूण १२ फ्लॅट्स आहेत. पोलीस कर्मचारी येथे वास्तव्यास गेलेले आहेत. या सदनिकेतील क्वॉर्टर ९ मध्ये पवन लव्हाळे हे कर्मचारी राहतात. त्यांच्या घरातील बेडरूम ही मोठ्या प्रमाणात गळत आहे. परिणामी लव्हाळे यांना नाईलाजाने पत्नीच्या बाळंतपणासाठी दुसरीकडे राहण्याची सोय करावी लागली. त्याचप्रमाण क्वॉर्टर क्रमांक २ मध्ये नीरज लोही नावाचे पोलीस कर्मचारी राहतात. या क्वॉर्टरमधील चे स्नानगृह व प्रसाधनगृहही गळत आहे. त्यामुळे दैनंदिन प्रात:विधी कसे करावे असा प्रश्न कार्मचारी वर्गाला पडला आहे. पाण्याच्या गळतीमुळे त्रस्त झालेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी ठाणेदारांकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार ठाणेदार चौधरी यांनी दोन महिन्यांपूर्वी संबंधीत अभियंत्याला लेखी पत्र देवून ठेकेदाराकडून त्वरीत दुरूस्ती करून द्यावी अशी विनंती केली. अद्यापही दुरूस्ती करण्यात आलेली नाही. तसेच बांधकाम परिसरात सर्वत्र साहित्य अस्ताव्यस्त पसरले असल्यामुळे इमारतीमध्ये ये-जा करतानाही अडचण जात आहे. तसेच पोलीस स्टेशनमध्ये जाताना समोरच्या भागातील टिनाही गळतात. दुरूस्तीसाठी पत्र देऊनही सदर दुरूस्ती झालेली नाही.(तालुका प्रतिनिधी)
शासकीय सदनिकेला गळती
By admin | Published: August 27, 2016 12:24 AM