विरूळ (आकाजी) : पती आणि पत्नी हे विश्वासाचं घट्ट नातं आजही समाजात कायम आहे. घरातील मंडळी पत्नी किंवा मुलं आजारी पडले तर, जीवाचे रान करून पैशाची जुळवाजुळव करतात. परंतु विरूळ येथील पतीला कर्करोग झाल्याचे समजताच पत्नीने दवाखान्यातून पलायन केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली असून ‘माझी बायको परत आणून द्या हो, म्हणण्याची वेळ या व्यक्तीवर आली आहे.
विरूळ येथील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला उत्तम नारनवरे हा जन्मत: पायांनी अपंग आहे. पती, पत्नी व मुलगा, असे त्याचे छोटे कुटुंब आहे. उत्तम हा गावातील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचा. त्याची पत्नी ही मोलमजुरी करून आपल्या संसारात हातभार लावायची, सर्व सुरळीत सुरू असताना उत्तमची प्रकृती खराब झाली. त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला कर्करोग झाल्याचे सांगितले. त्यानंतर पैशाची जुळवाजुळव करून कसातरी उपचार सुरू केला. सोबतच पत्नीही त्याच्या आजारपणात ठाम उभी राहिली.
१५ दिवस रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची पत्नी अचानक बेपत्ता झाल्याने सर्वत्र शोध सुरू केला. अद्याप थांगपत्ता लागला नसून गंभीर आजार झालेला उत्तम आता एकाकी पडला आहे. रुग्णालयात त्याच्यासोबत कुणीही नसल्याने अखेर त्याने घर गाठले. आज उत्तम हा गंभीर आजाराने पलंगावर पडून आहे. अधून-मधून उपचाराकरिता रुग्णालयात जातो. पत्नी जवळ नसल्याने खाण्याचेही वांदे झाले आहे. दहावीत असलेला मुलगा आपले शिक्षण सोडून मजुरी करून वडिलांचा सांभाळ करतो. त्यांच्या उपचाराकरिता पैशाची गरज असून दानशुरांनी मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे.
गावातील अत्यंत गरीब व अपंग असलेल्या उत्तमची व्यथा पाहून आम्ही गहिवरलो. मी स्वत: तसेच सातपुते महाराज व गावातील सामाजिक मंडळी आम्ही बाहेरगावी जाऊन उत्तमच्या पत्नीचा शोध घेतला. परंतु त्याची पत्नी भेटली नाही. याबाबत सेवाग्राम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
- ॲड. दुर्गाप्रसाद मेहरे, सरपंच विरूळ (आकाजी)