आर्वी (वर्धा) : उन्हाळा म्हटलं कीं, सर्वत्र थंडपेयाची दुकाने लागतात. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी शीतपेय व इतरांकडून सध्या मोठ्या प्रमाणावर लिंबांची मागणी वाढल्याने आर्वी बाजारात लिंबाचा भाव प्रतिकिलो ३०० रुपयांवर पोहोचला असून किरकोळ भाजीविक्रेते १० रुपयांचे एक लिंबू या भावाने विक्री करीत आहे.
उन्हाळ्यात सर्वत्र थंड शीतपेयाच्या दुकानांत लिंबांची मागणी वाढल्याने व यातच लग्नसराई सुरू झाल्याने लिंबाचे भाव वधारले आहेत. उन्हाळ्यात लिंबांच्या झाडाला बहर येऊन त्याला लिंबू लागण्याचा हंगाम असतो. पण, यावर्षी अतिउष्ण तापमानामुळे लिंबांच्या झाडाला यावर्षी बहरच आला नसल्याने आर्वी बाजारपेठेत लिंबाला मोठी मागणी आहे.
सध्या आर्वीत अमरावती, नागपूर व आर्वी तालुक्यातील काही गावांत लिंबू उत्पादक शेतकरी आहेत. परंतु, यावर्षी त्यांनाही फटका बसला आहे. निसर्गाचा लहरीपणा व वाढते तापमान लिंबासाठी हानिकारक ठरत असल्याचे अनुभवी शेतकरी सांगतात.
प्रवासादरम्यान सामान्य नागरिक लिंबाची मागणी करतात. परंतु, त्यांनाही लिंबू बाजारात सहज उपलब्ध होत नाही. या वाढलेल्या लिंबाच्या भावाचा नेटकऱ्यांकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे. सध्या आर्वीच्या बाजारात लिंबाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याचे चित्र आहे.
सध्या आर्वीच्या बाजारात मोठ्या प्रमाणात लिंबाचा तुटवडा असून बाहेरगावाहून लिंबू विक्रीसाठी येत आहे. लिंबाचे भाव अचानक वाढल्याने चिल्लर भाजीविक्रेते लिंबू विकण्यासाठी घेत नाहीत.
राजेश पोकळे, भाजी विक्रेता